नाशिक : कोथिंबिरीसारख्या अवघ्या दीड ते दोन महिन्यांच्या पिकातून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील शेतकऱ्याला चार एकरात तब्बल १२ लाख ५१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने कोरोनाकाळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. सोशल मीडियावरही या शेतकऱ्याच्या कष्टाचं अनेकांनी कौतुक केलंय तर कित्येकांना आनंद झालाय.
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व दोडी शिवारात विनायक हेमाडे यांची शेतजमीन आहे. परिसरात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी मेथी व कोथिंबीर पिकांना पसंती दिली. कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळत असल्याने हेमाडे यांनी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चार एकर क्षेत्रावर हायब्रिड कोथंबिरीची लागवड केली होती. त्यासाठी ४८ किलो बियाणे लागले. त्यांना ३० हजार रुपयांच्या आसपास लागवडीचा खर्च आला. लागवडीनंतर साधारणत: ४० दिवसांनी कोथिंबीर परिपक्व झाली. ही कोथिंबीर मार्केटला न नेता त्यांनी जागेवरच विक्री करण्याचा निर्णय घेतला. येथील व्यापारी सुदाम शेळके यांच्या मध्यस्थीने दापूर येथील भाजीपाला व्यापारी शिवाजी दराडे यांनी कोथिंबीर पिकाची पाहणी करुन चार एकरातील कोथिंबिरीचा सौदा साडेबारा लाखांना पक्का केला. कोथिंबिरीचा सौदा झाल्यानंतर संबंधित व्यापाºयाकडून चांगल्या पद्धतीने निगा राखली जात असून दोन ते तीन दिवसात तोडणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. लाँकडाऊन व कोरोनाच्या काळात खर्चवजा जाता शेतकºयाला चांगले उत्पन्न झाल्याने परिसरातील शेतकºयात समाधानाचे वातावरण आहे.जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चार एकर क्षेत्रावर कोथिंबिरीची लागवड केली होती. परिस्थिती बेताची असल्याने गावातील कृषी सेवा केंद्राचे संचालक अनंता घुले यांच्याकडून कोथिंबीरीचे बियाणे उधारीवर घेऊन लागवड केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही शेती व्यवसायाकडे लक्ष घालून शेतीची मशागत करून पिके घेतली. दीड महिन्याच्या कालावधीत मी व घरच्या लोकांनी चांगली निगा राखली. तसेच वेळेवर औषध फवारणी व पाणी दिले. विहिर व बोअरवेलला पाणी असल्यामुळे कोथिंबिरीचे पीक चांगले आले. दोन पैसे मिळाले तरच शेतकºयांना शेती परवडणारी आहे.-विनायक हेमाडे, शेतकरी, नांदूरशिंगोटेफोटो ओळी : विनायक हेमाडे
सोशल मीडियावर व्हायरल फोटो चुकीचा
सोशल मीडियावर कालपासून डोक्यावर पैशाचं गाठोडं बांधलेल्या एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. 4 एकरात 12 लाख रुपयांचं उत्पन्न कमावणारा हाच तो शेतकरी असे सांगत हा फोटो व्हायरल होत आहे. मात्र, तो फोटो सिन्नरमधील कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याचा नसून तो दुसऱ्या कोणाचा तरी असल्याचे समजते. कारण, विनायक हेमाडे यांना तो फोटो आपला, किंवा कुटंबातील कुठल्याही सदस्याचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, बातमी खरी आहे, माहिती खरी आहे. पण सोशल मीडियावरील तो फोटो खोटा असल्याचे निष्पण्ण झाले आहे.