मनोज देवरे ।कळवण : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देवस्थाने भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. देवाच्या दारात भाविकच नसल्याने दानपेट्याही रित्या आहेत. त्यामुळे देवस्थानांच्या उत्पन्नावर कमालीचा परिणाम झाला आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ म्हणून गणल्या सप्तशृंग देवी ट्रस्टचे उत्पन्न शून्यावर आले असतानाखर्च मात्र दरमहा ५० लाख रुपये होत आहे.सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये दोनशेच्या आसपास कर्मचारी काम करतात. कोरोनामुळे यापैकी ५० टक्के कर्मचारी सध्या कामावर आहेत. त्यांची १५ दिवसांची शिफ्ट ठेवण्यात आलेली आहे. अर्थकारण बिघडले असले तरी ट्रस्टने अद्याप कुणालाही कामावरून कमी केलेले नाही. मात्र, ट्रस्टमधील आजारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. काही अधिकारी मात्र रोज नित्यनियमाने कामावर येत आहेत. बहुतांशी कर्मचारी हे कळवण, दिंडोरी व इतर दुर्गम तालुक्यातील असून, त्यातील ६३ कर्मचारी कायमस्वरूपी तर १३७ हे किमान वेतनावर काही वर्षांपासून काम करीत आहेत. दि. १८ मार्चपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्यामुळे उत्पन्न शून्य असले तरी महिन्याला सुमारे ५० लाखरुपयांचा खर्च सुरू असल्याचे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी सांगितले.मंदिर बंद असल्यामुळे भाविकांकडून देणगी मिळत नाही. त्यामुळे श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे दैनंदिन देणगी व निधी स्वरूपातील उत्पन्न बंद झाले आहे. मात्र ट्रस्टमध्ये व मंदिरात काम करणारया कर्मचाऱ्यांना पगार, अन्नदान, मंदिर देखरेख, पूजा, धार्मिक विधी आदीसाठी अंदाजे महिन्याला ५० लाख रुपयांच्या आसपास खर्च येत आहे. त्या तुलनेत उत्पन्न शून्यावर आले आहे. देशाच्या कान्याकोपºयातून सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. भाविकांची गर्दी व भाविकांचा आर्थिकस्तर पाहता ट्रस्टला उत्पन्न कमी असते. परंतु मंदिर बंद झाल्यापासून तर मंदिराच्या पेटीमध्ये एकही पैसा पडलेला नाही. अशी बिकट स्थिती असतानाही मंदिर ट्रस्टकडून सप्तशृंग गडावरील बेघर व गरजवंत लोकांना दोन वेळे मोफत अन्नदान केले जात आहे.--------------------------------आॅनलाइनदेणगीही घटलीआॅनलाइनच्या माध्यमातून ट्रस्टला दोन महिन्यात अतिशय अल्पप्रमाणात देणगी प्राप्त झाली आहे. काही प्रमाणात वस्तुरूपी साहित्य प्राप्त झाले आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने उभारलेल्या कोरोना विषाणू संसर्ग-आरोग्य जनजागृती अभियान आणि दैनंदिन नियोजनानुसार सुरू असलेल्या मोफत अन्नदान सुविधेसाठी तसेच भक्तनिवास, मंदिर जीर्णोद्धार व अन्नछत्र इमारतीच्या नूतनीकरण कामकाजासाठी इतर उत्पन्न घटक बंद असल्यामुळे निधीची कमतरता भासू नये, म्हणून यापूर्वी भाविकांच्या विनंतीनुसार आॅनलाइन देणगी सुविधा कार्यान्वित केलेली आहे.--------------------------------------कोरोनाविरोधी जनजागृती अभियान४ कोरोनामुळे यंदाचा चैत्रोत्सवही रद्द करावा लागला. त्याचाही परिणाम ट्रस्टच्या उत्पन्नावर झाला. दरम्यान, चैत्रोत्सव नियोजनाचा भाग म्हणून ट्रस्टने १ मार्च २०२० पासूनच कोरोनाविरोधी जनजागृती अभियान सुरू केले होते. त्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आल्याशिवाय, ट्रस्टच्या धर्मार्थ दवाखान्यातून सातत्यपूर्वक मोफत वैद्यकीय उपचार व रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली.४ याशिवाय कर्मचाºयांना मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर व व्हिटॅमिन सी औषधांचेही वाटप करण्यात आले आहे. याशिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २१ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. कळवण येथील आरोग्य विभाग, पोलीस व महसूल विभाग अंतर्गत कार्यरत पदाधिकारी व कर्मचारी वर्गाला विशेष मदत म्हणून मास्क, हॅण्डग्लोज व सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहेत. आजपावेतो जवळपास ४० लक्ष रुपये जनजागृती अभियान उपक्र मांवर खर्च करण्यात आले आहे.--------------------------------------------उत्पन्नाचेस्रोत बंदश्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे उत्पन्नाचे स्रोत म्हणजे मंदिरात असलेल्या दानपेटीत प्राप्त होणारी देणगी, देणगी कार्यालय येथे प्राप्त होणारा निधी, भक्तनिवास सेवा सुविधा देणगी, अन्नछत्र देणगी, प्रसाद विक्र ी तसेच दैनंदिन पूजा व आरती संबंधित देणगी आदी होय. मात्र दोन महिन्यांपासून सेवा-सुविधा बंद असल्यामुळे या सर्व प्रकारातील देणगी व निधी संपूर्णत: बंद झाले आहेत. कोरोनामुळे दि. १८ मार्चपासून मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले असले मंदिरात देवाचे नित्योपचार, पंचामृतपूजा-आरती केली जात आहे. मंदिरात पुजारी, मंदिर व सुरक्षा कर्मचारी तसेच इतर विभागातील निर्धारित नियोजनानुसार कर्मचारी व अधिकारी कामावर येत असतात.
सप्तशृंगी देवी ट्रस्टचे उत्पन्न शून्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 9:22 PM