नाशिक : महापालिकेच्या वतीने मिळकती सर्वेक्षणासाठी देण्यात आलेल्या ठेकेदार कंपनीचे कर्मचारी कोणत्याही पूर्वतयारी शिवाय मिळकत सर्वेक्षण करीत असून, नागरिकांकडेच मिळकतींचे पुरावे मागत आहेत. त्यामुळे ज्या भागात सर्वेक्षण करण्यासाठी हे कर्मचारी जातात, त्यांना तेथील सर्व्हे क्रमांकच माहिती नसतील तर सर्वेक्षणाचे काम कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने जीओ कंपनीस मिळकत सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. महापालिकेने यापूर्वी स्पेक या कंपनीस मिळकत सर्वेक्षणाचा ठेका देण्यात आला होता. त्यावेळी अशाच प्रकारे महाविद्यालयीन युवक नियुक्त करण्यात आले होते. पश्चिम आणि सातपूर विभागाचे काम जेमतेम पूर्ण करून कंपनीने काम अर्धवट सोडले. त्यानंतर आता जीओ कंपनीला ठेका देण्यात आला आहे. कंपनीचे कर्मचारी ज्या मिळकतींमध्ये सर्र्वेक्षणासाठी जातात, त्याचा सर्व्हेनंबर तसेच ते क्षेत्र शेती आहे की रहिवासी याची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे, परंतु या कर्मचाऱ्यांना काहीच माहिती नसते. मिळकतधारकाकडेच ते बांधकाम नकाशा आणि पूर्णत्वाचा दाखला मागतात आणि त्यानुसार नोंदी करतात. संबंधित कर्मचाऱ्याला या भागाविषयी बाकी कोणतेच ज्ञान नसते.शहरातील चोपडा इस्टेट भागात अशाच प्रकारे मिळकत सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारे नागरिकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. तुमच्याकडे मिळकतीचे काय कागदपत्रे आहेत, असे विचारणा केली तेव्हा त्यांच्याकडे पालिकेचे एक सामान्य पत्र होते. त्यात नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन होते, परंतु त्यापलीकडे कोणतीही माहिती नव्हती. कोणत्याही प्रकारची माहिती नसलेले कर्मचारी मिळकतींचे सर्वेक्षण करत असतील त्यांच्याकडून कोणत्याही उणिवांशिवाय कसे काम होणार? असा प्रश्न आहे.
कोणतीही पूर्वतयारी न करताच मिळकत सर्वेक्षण
By admin | Published: January 17, 2017 1:05 AM