नाशिक : आयकर विभागाची कार्यप्रणाली काळानुरूप आधुनिक होत असून ‘वाणी हाउस’मधील अडगळीच्या ठिकाणाहून आयकर कार्यालय एका चांगल्या जागेत आले आहे. यामुळे नागरिकांसह अधिका-यांची गैरसोय टळण्यास मदत होईल. पुणे विभागांतर्गत येणाºया सर्व शहरांमध्ये दर बुधवारी दुपारी एक तास आयकरचे अधिकारी जनतेला विना अपॉइंटमेंट भेटणार असल्याची घोषणा प्रधान मुख्य आयकर आयुक्त ए. सी. शुक्ल यांनी केली.नाशिक आयकर विभागाचे मुख्य कार्यालय वाणी हाउस येथे सुरू होते. सदर कार्यालय हे बुधवार (दि.१३)पासून गडकरी चौकामध्ये जनलक्ष्मी बॅँकेच्या पाठीमागे असलेल्या ‘श्री साई शोभन’ या व्यावसायिक संकुलात स्थलांतरित करण्यात आले आहे. या नूतन जागेवरील कार्यालयाचे उद्घाटन शुक्ल यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना शुक्ल म्हणाले की, करदात्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सरकार आपल्या स्तरावर प्रयत्नशील असून, सातत्याने आयकर विभागाच्या आधुनिकीकरणावर सरकारकडून भर दिला जात आहे. याअंतर्गत सरकारने आयकर खात्याचे दोन आॅनलाइन पोर्टल सुरू केले आहेत. यामध्ये ‘सीपी ग्राम’ व ‘ई-निर्वाण’ यांचा समावेश आहे. या पोर्टलच्या माध्यमातून करदाते त्यांच्या तक्रारी, अडचणी मांडू शकतात व आयकर विभागाशी संबंधित अन्य कुठल्याही प्रकारची माहिती थेट प्राप्त करू शकतात. एकूणच आयकरशी संबंधित कामकाजासाठी करदात्यांना कुठल्याही प्रकारे कार्यालयात खेटा मारण्याची गरज राहणार नाही, असेही शुक्ल म्हणाले. दरम्यान, कोणतीही आगाऊ भेटीची वेळ आयकर अधिका-यांची जनसामान्यांना घेण्याची आवश्यकता नाही. पुणे विभागांतर्गत सर्व शहरांमधील आयकर कार्यालयातील अधिकारी दर बुधवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान नागरिकांना उपलब्ध राहणार असल्याचे सांगितले.