संदीप भालेराव, नाशिक: बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिकमधील काही बांधकाम व्यावसायिक आणि सरकारी ठेकेदारांची कार्यालये, तसेच घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. जवळपास १५० अधिकारी ७० वाहनांच्या ताफ्यासह नाशिकमध्ये दाखल झाले आणि त्यांनी एकाच वेळी १४ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत, तर २० ते २५ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केले. या धाडीत अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याचे वृत्त असून अजूनही कारवाई सुरूच असल्याचे समजते.
आयकर विभागाच्या रडावर नाशिकमध्ये बडे व्यावसायिक आणि ठेकेदार असून यापूर्वी काही बांधकाम व्यावसायिक, तसेच कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकलेल्या आहेत. बुधवारी (दि.३१) सकाळपासून पुन्हा धाडसत्र सुरू झाले आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास जवळपास ७० वाहनांमधून १५० अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यामध्ये नागपूर आयकर विभागाचे ४२ कर्मचारी आणि ३४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरात एकाच वेळी धाडसत्र सुरू केल्याने व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.