नाशिक : विधानसभा निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज झाला असून, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पथकाची नियुक्ती करून काळा पैसा रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती नागपूरचे मुख्य आयकर संचालक (शोध) जयराज काजला यांनी पत्रकारांना दिली.विधानसभा निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये जलद कृती पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे काजला यांनी सांगितले. याशिवाय या भागातील नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि जळगाव या चार विमानतळांवर हवाई सूचना पथके २४ तास तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय रेल्वे सुरक्षा दल व पोलिसांचीही मदत घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.काळ्या पैशासंदर्भातील तक्रारी करण्यासाठी अथवा माहिती देण्यासाठी नागपूर येथे २४ तास सुरू राहणारा एक कक्ष सुरू केल्याची माहिती काजला यांनी दिली. या कक्षाचा १८०० २३३ ३७८५ हा टोल फ्री क्रमांक आहे. याशिवाय व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ९४०३३९१६६४ या क्रमांकावर अथवा ०७१२-२५२५८४४ या फॅक्स क्रमांकावरही माहिती कळविता येऊ शकेल, असे काजला म्हणाले. यावेळी नाशिकचे अतिरिक्त आयकर संचालक (शोध) अमितकुमार सिंह, सहायक आयकर संचालक अशोक मुराई व संदीप जुमले, आयकर अधिकारी धनराज बोराडे हे उपस्थित होते.प्रत्येक जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकाचा प्रमुख म्हणून एक सबनोडल आॅफिसर असेल. याशिवाय दोन आयकर अधिकारी आणि तीन निरीक्षक असतील. हे पथक जिल्ह्यात दिवस-रात्र लक्ष ठेवून असेल. आलेल्या तक्रारींची या पथकामार्फत छाननी केली जाईल.
काळ्या पैशाचा वापर रोखण्यास आयकर विभाग सज्ज : काजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:44 AM