लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : महानिर्मिती, महावितरण व महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर नेमलेल्या रानडे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी विद्युत भवन व एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र येथे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करत घोषणाबाजी केली. महानिर्मिती, महावितरण व महापारेषण या तिन्ही कंपन्यातील राज्यातील कंत्राटी वीज कामगारांनी सोमवारपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर वीज कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना समान काम समात वेतन देऊन कंपनीत कायम करावे, कायम होईपर्यंत मनोज रानडे समितीच्या शिफारशींनुसार पूर्वाश्रमीच्या वीज मंडळातील रोजंदारी कामगार पद्धती लागू करावी, कंत्राटी कामगारांची सेवाज्येष्ठता यादी तयार करावी व कामावरून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, कंपनी परिपत्रकांतील आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी आदि प्रमुख मागण्यांसाठी कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने विद्युत भवन व एकलहरे वीज औष्णिक केंद्रात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करून घोषणाबाजी केली. विद्युत भवन येथे उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन व एकलहरे येथे नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनामध्ये व्ही.डी. धनवटे, रामबाबा पठारे, शंकर गडाख, अशोक घेगडमल, नाना लोंढे, किशोर बागुल, बाळासाहेब पोवळे, अरुण आहिरे, भाऊसाहेब बारस्कर, पिलाजी जगताप, राजेंद्र वलवे, किशोर पाटील आदिंसह कंत्राटी कामगार सहभागी झाले होते.
कंत्राटी कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन
By admin | Published: May 23, 2017 12:59 AM