दिव्यांगांना मानधनाची प्रतीक्षा
नाशिक : दिव्यांगांना महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानधनाची प्रतीक्षा आहे. दिव्यांग कल्याणकारी योजनेंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आर्थिक मदत केली जाते. महापालिकेकडून याबाबतची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी दिव्यांगांकडून केली जात आहे.
पेट्राेल दरामुळे ग्राहकांना किंचित दिलासा
नाशिक : लीटरमागे पेट्रोलचे दर १७ तर डिझेलचे दर ६ रुपयांनी कमी झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनातील दरवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. आता दर पैशांमध्ये कमी झाले असले तरी आणखी दर उतरतील, अशी आशा वाहनधारक बाळगून आहेत.
शासकीय कार्यालयांमधील गर्दी ओसरली
नाशिक : कोरोना रुग्णवाढीची भीती सर्वांनाच निर्माण झाल्याने आता शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्यांची संख्यादेखील कमी झाली असल्याचे दिसून येते. कार्यालयांमध्ये दैनंदिन असणारी गर्दी आता कमी झाल्याने कार्यालयीन आवारही सुनेसुने झाले आहे. नेहमीच वाहने आणि माणसांच्या गर्दीमुळे गजबजणारी कार्यालये शांत भासू लागली आहेत.
द्वारका चौकात भुयारी मार्गाची मागणी
नाशिक : द्वारका चौकातील वाहतूककोंडी लक्षात घेता भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी होत आहे. चौकात पादचाऱ्यांसाठी मार्ग करण्यात आला आहे. याच मार्गाला विस्तृत करून नाशिक रोड जाणाऱ्या येणाऱ्या वाहतुकीला स्वतंत्र अंडरग्राउंड मार्ग तयार करावा, जेणेकरून या मार्गावरील कोंडी दूर होऊ शकेल.
गर्दीवर आता सीसीटीव्हीने नियंत्रण
नाशिक : बाजारपेठेतील गर्दी कमी होणार नसेल, तर दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेरे पाहून गर्दी करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. दुकानदारांनी गर्दी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते.