टाकळी चौकात वाहनांची गर्दी
नाशिक: औरंगाबाद रोडकडे जाणारी वाहतूक टाकळी मार्गे वळविण्यात आल्याने या चौकात वाहतूकीची कोंडी होऊ लागली आहे. नाशिक-पुणे महामार्गावरून जाणारी वाहतूक आयनॉक्स चौकातून वळविण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी या मार्गवरून वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. सलग सुट्या असल्याने या मार्गावरील वाहतूक वाढली आहे.
वाहतूक बेटाचा वापर प्रसिद्धीसाठी
नाशिक: जेलरोडजवळील नारायणबापू चौकातील वाहतूक बेटाचा वापर जाहिरातींसाठी होऊ लागला आहे. तर विशिष्ट कार्यक्रमाच्या दिवशी अनेकजण झेंडेदेखील लावत असल्याने वाहतूक बेटाचा वापर नेमका कुणासाठी, असा प्रश्न विचारला जात आहे. खासगी संस्थेचे वाहतूक बेट विकसित केले गेले आहे. या ठिकाणी जाहिरातींचे फ्लेक्स लागतात. मनपाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नाशिकरोडला रस्त्यावर पुन्हा भाजीबाजार
नाशिक: नाशिकरोड येथील जुन्या स्टेट बँक चौकातील रस्त्यावर भाजीबाजार भरत असल्याने वाहनधारकांची कोंडी होत आहे. येथील भाजीबाजार हटवून उड्डाणपुलाखाली बाजार सुरू झाला. आता पुन्हा एकदा जुन्या जागेवर काही विक्रेते दुकाने थाटून बसले आहेत. पुलाखालील भाजीविक्रेतेदेखील या ठिकाणी येऊन बसत असल्याने बाजार वाढतच आहे.
त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वाहनांची गर्दी
नाशिक : सलग तीन दिवस सुट्या असल्याने सुटीची मौज करण्यासाठी पर्यटक नाशिकमध्ये येत आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वाहनांची वर्दळ दिसून आली. त्र्यंबकेश्वरमधील हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंगही झाली असल्याने पर्यटकांचा ओघ पुढील शनिवारी राहाणार आहे.