देवळा : महाराष्ट्र कल्याण संस्थेच्या देखरेखीखालील देवळा बसस्थानकातील सुलभ शौचालय व स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून, तेथे मार्गदर्शक फलक नसल्याने महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. स्त्री व पुरुषांसाठी दिशादर्शक फलक शौचालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावे तसेच स्वच्छतागृहाची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. देवळा शहर हे चौफुलीवर वसलेले गाव असून, दिवसभरात येथील बसस्थानकात जवळपास ४५० बसेस ये-जा करतात. यामुळे हे बसस्थानक नेहमी प्रवाशांनी गजबजलेले असते. बसस्थानकावरील सुलभ शौचालय व स्वच्छतागृहाचे देखरेखीचे काम महाराष्ट्र कल्याण संस्थेकडे आहे. या संस्थेचे बसस्थानकातील स्वच्छतागृहाकडे दुर्लक्ष झालेले असून, त्याची दुरवस्था झालेली आहे. शौचालयाचे दरवाजे मोडकळीस आलेले आहेत. स्वच्छतागृहाबाहेर स्त्रियांसाठी दिशादर्शक फलक नसल्याने महिला प्रवाशांची कुचंबणा होते. स्वच्छतागृहासमोर जाहिरातीच्या फलकांची गर्दी झाल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना स्वच्छतागृहच दिसत नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. स्वच्छतागृहाच्या घाण पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने हे पाणी कोलती नदीपात्रात वाहून जाते. रविवारचा आठवडे बाजार हा कोलती नदीपात्रालगत भरत असल्याने नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागते. नदीपात्रालगत ग्रामदैवत दुर्गामाता मंदिर, स्वामी समर्थ मंदिर आहे. देवळा बसस्थानकातून विविध माध्यमातून महामंडळास मोठे उत्पन्न मिळते. त्या तुलनेत मिळणाऱ्या सुविधा अत्यंत तोकड्या आहेत. (वार्ताहर)
बसस्थानकात फलकाअभावी गैरसोय
By admin | Published: July 31, 2016 10:43 PM