कळवण : देवळा तालुक्याची निर्मिती होऊन दहा ते बारा वर्षांचा कालावधी लोटला गेला तरी देवळावासीयांना अडचणींचा सामना करीत तोंड द्यावे लागत आहे. देवळा व चांदवड या तालुक्यासाठी चांदवड येथे असलेले प्रांताधिकारी कार्यालय अंतर्गत देवळावासीयांची अन्य कामे तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयांच्या संदर्भातील कामे होत असल्याने याकरिता वेळ व पैसा खर्च होतो शिवाय देवळा तालुक्यातील जनतेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची कैफियत देवळा तालुक्यातील जनतेने मांडली आहे.या प्रश्नी कळवण बार असोसिएशनने प्रधान जिल्हा न्यायाधीश व जिल्हाधिकारी तसेच आमदार डॉ. राहुल अहेर व जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती केदार अहेर यांच्याकडे निवेदन देऊन प्रांताधिकारी कार्यालयातील देवळा तालुक्यातील कामे देवळा येथे करण्याची मागणी केली आहे.कळवण बार असोसिएशनने अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वकील संघाच्या सभेत चांदवड प्रांताधिकारी यांचे देवळा तालुक्यातील कामकाज देवळा येथे चालविण्याबाबत ठराव केला असून यासंदर्भात अॅड. एन. के. सोनवणे यांनी बैठकीत सूचना मांडली असून अॅड. पी. एस. पगार यांनी अनुमोदन दिले आहे.देवळा तालुक्यातील जनतेला प्रांताधिकारी कार्यालयातील कामकाजासाठी चांदवड येथील प्रांताधिकारी कार्यालयात जावे लागते. देवळा येथून २० किमी अंतरावरील या कार्यालयात जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसने किंवा खासगी वाहनाने जावे लागत असल्याने देवळा तालुक्यातील जनतेचा वेळ व पैसा खर्च होतो. कधी कधी संपूर्ण दिवसभर या कार्यालय परिसरात थांबावे लागते. त्यामुळे इतरही खर्च वाढत असल्याने या कार्यालयातील कामासाठी देवळावासीयांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कुचंबना होत आहे. देवळा तालुक्यातील ४६ गावांतील जनतेची अडचण लक्षात घेऊन ती दूर करण्यासाठी महिन्याच्या चार शुक्रवारी व दोन शनिवारी असे सहा दिवस देवळा येथे प्रांताधिकारी यांनी येऊन देवळा तालुक्यातील कामकाज पार पाडावे किंवा प्रशासनाच्या सोयीनुसार महिन्यातून एक आठवडा सदर कामे देवळा येथे देवळा तालुक्यातील कामकाज चालवावे अशा स्वरूपाची कळवण बार असोसिएशनने मागणी करून वकील संघाच्या बैठकीत ठराव केला आहे. यासंदर्भात कळवण बार असोसिएशनने आमदार डॉ. राहुल अहेर व जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती केदा अहेर यांना निवेदन देऊन मागणीकडे लक्ष वेधले आहे.दहा बारा वर्षांपूर्वी देवळा या तालुक्याची स्वतंत्र निर्मिती झाली असून प्रांताधिकारी कार्यालयातील तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयांच्या संदर्भातील आरटीएस अपिले, नोंदीसंबंधित तक्रारी अर्ज, जातीचे दाखले आणि प्रांताधिकारी कार्यालयाकडे जी कामे असतील त्या कामांसाठी देवळा तालुक्यातील जनतेला चांदवड येथे जावे लागत असून जनतेच्या दृष्टिकोनातून गैरसोयीचे आणि वेळ व आर्थिक नुकसान करणारे आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून देवळा येथे दर शुक्र वारी व शनिवारी या दोन दिवशी म्हणजे महिन्यातील सहा दिवस चांदवड प्रांताधिकारी कार्यालयाचे कामकाज देवळा येथे चालवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.(वार्ताहर)
प्रांताधिकारी कार्यालयात गैरसोय
By admin | Published: September 09, 2016 12:41 AM