विल्होळी : विल्होळी-गौळणा रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या विद्युत खांबामुळे अपघातात वाढ झाली असून, संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सदर रस्त्यावर माध्यमिक विद्यालय विल्होळी, गोपाळराव गुळवे अभियांत्रिकी महाविद्यालय, नासिक पब्लिक स्कूल, कंपनी, गुदाम, वीटभट्टी असल्याने या रस्त्याने विद्यार्थी, शेतकरी यांच्यासह अवजड वाहने ये-जा करत असतात. अनेकदा लहान-मोठे अपघात होतात. याबाबत वेळोवेळी, विद्युत पुरवठा विभागास तक्रार करूनही खांबाचे स्थलांतराकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत विचारणा केली असता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हद्दीतील रस्त्यावर असून, त्याला स्थलांतरित करण्यासाठी बांधकाम विभागाने वीजपुरवठा विभागास अर्ज करून स्थलांतराची रक्कम भरणे गरजेचे आहे. तेव्हा वीजपुरवठा विभाग खांबाचे स्थलांतर करून देईल, असे सांगण्यात येते. सदर खांबामुळे अनेक अपघात झाले असून, याकडे विद्युत पुरवठा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करत आहे. पुढील मोठ्या अपघातांचा धोका लक्षात घेता त्वरित खांबाचे स्थलांतर करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विल्होळी रस्त्यावरील वीज खांबामुळे अपघातात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:41 AM