धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करावी
नाशिक : कोविड पुन्हा एकदा बळावल्याने या काळात रस्त्यावर थुंकणाऱ्यांमुळे संसर्ग अधिक वेगाने पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता आहे. सध्या नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, काही नागरिक तर मास्क खाली करून थुंकत असल्याने अशा नागरिकांवर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
सीबीएस परिसरात पुन्हा ट्रॅफिक समस्या
नाशिक : सीबीएस परिसरातील रस्त्यावर नागरिकांकडून पूर्वीपासूनच दुतर्फा प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर वाहने उभी करून ठेवली जातात. त्यात आता या परिसरात वाहनांची रहदारी वाढली असल्याने तर वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागते. अनेकदा वादावादीचे प्रकारदेखील घडत असल्याने दुतर्फा वाहने पार्किंग बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दिंडोरी रोडवर भाजी विक्रेत्यांमुळे अडथळा
नाशिक : दिंडोरी रोडवर भाजीचे छोटे-मोठे विक्रेते दुतर्फा दुकाने लावत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडूनही रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने चारचाकी वाहने चालविताना वाहनचालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
कोरोनाच्या बहरातही रस्त्यांवर गर्दी
नाशिक : कोरोना प्रचंड प्रमाणात वाढत असतानाही बाजारपेठांमधील नागरिकांची गर्दी कमी होण्यास तयार नाही. सायंकाळी सातनंतर निर्बंध आहेत, म्हणून नागरिक आता सायंकाळी चार ते सहा -साडेसहा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी येत आहेत.
मोकाट श्वानांकडील दुर्लक्षामुळे नाराजी
नाशिक : शहरातील सारडा सर्कल, गंजमाळ परिसरात मोकाट श्वानांचा सुळसुळाट वाढला आहे. रात्री हे श्वान रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. काहीवेळा वाहनांच्या पाठीमागे धावतात. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडून काहीवेळा दुचाकी घसरून चालक जखमी झाल्याचे प्रकारही घडले असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.