गावाजवळून दुचाकी, चारचाकी वाहने अतिवेगाने जात असल्यामुळे अपघात होऊन आतापर्यंत लहानू बुधा बागुल, राजाराम गोविंदा बागुल , प्रवीण पंढरीनाथ चौरे, राहुल नारायण बहिरम आदी ग्रामस्थांना गंभीर दुखापत झाली आहे. काहींना जीव गमवावा लागला आहे. दत्तनगर ग्रामस्थांनी यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा लेखी व तोंडी तक्रारी करूनही त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
गावालगत असलेल्या रस्त्यावरून वाहनाची वर्दळ वाढली आहे. भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे दत्तनगर ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. भरधाव वाहनाच्या दहशतीच्या वातावरणात ग्रामस्थ राहत असून, संबंधित विभाग मात्र निद्रावस्थेत आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस अंगणवाडी असल्याने लहान मुलांना रस्ता ओलांडतानादेखील पालक भीतीच्या छायेखाली वावरताना दिसत आहे. त्यामुळे गाव परिसरात पाचशे मीटरवर तीन गतिरोधक तत्काळ टाकावेत अशी मागणी अभोणा पश्चिम आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश बागूल व दत्तनगर येथील ग्रामस्थ प्रकाश पवार, नारायण पवार, पंडित पवार, पोपट पवार, मोतीराम गायकवाड, चिंतामण पवार, शांताराम भोये, हरिश्चंद्र पवार, पोपट पवार, संतोष पवार, युवराज पवार, भाऊराव बागुल, पुंडलिक पवार, संदीप पवार यांनी केली आहे.