अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीसाठी शासनाने लागू केलेल्या अटी व शर्तीमध्ये अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस पदावर सरळसेवा नियुक्तीसाठी २१ ते ३० वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित केली आहे. आदिवासी ग्रामीण भागात अनेक विधवा परितक्त्या महिलांचे वयोमान ३० वर्षांपेक्षा जास्त असल्यामुळे ३० वर्षे वयोमर्यादाच्या अटी-शर्तीमुळे स्थानिक महिला सरळ सेवा भरतीच्या वेळी अपात्र होतात व नोकरीच्या संधीपासून वंचित राहतात. वयोमर्यादेत वाढ करण्याबाबत ग्रामीण भागातील विधवा परित्यक्ता महिलांची मागणी असल्याने सदरची वयोमर्यादा ४० वर्षांपर्यंत करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती अश्विनी आहेर यांनी नाशिक भेटीवर आलेल्या मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त इंद्रा मालो यांनी वयोमर्यादेत वर्ष ३२ पर्यंत वाढ करण्याचे आदेश काढलेले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
(फोटो २४ झेडपी)- अंगणवाडी सेविका वयोमर्यादेत वाढ करण्याचे पत्र महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांना देताना अश्विनी आहेर.