नाशिक : जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखानावगळता इतर सर्व साखर कारखाने बंद असूनही यावर्षीच्या हंगामात तब्बल १७ हजार ६८८.२१ हेक्टरवर ऊसलागवड करण्यात आली आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी ऊसलागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, जिल्ह्यात ऊसक्षेत्र वाढले मात्र कारखाने थकले, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शाश्वत पीक म्हणून उसाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांची मदार संपूर्णपणे परजिल्ह्यातील कारखान्यांवर आहे. विशेष म्हणजे यावर्षी कोविड-१९च्या संकटाचा ऊस उत्पादकांनाही फटका बसला असला तरी ऊस लागवडीचा उत्साह कमी झालेला नाही, असे दिसून येत आहे.निफाड तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर ऊसलागवड करण्यात आली असून, त्याखालोखाल दिंडोरी तालुक्यातील क्षेत्र आहे. ऊस-लागवडीत जिल्ह्यातील आदिवासी तालुकेही मागे नसून सुरगाणावगळता पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्येही दिवसेंदिवस उसाचे क्षेत्र वाढत आहे.वेगवेगळ्या कारणांमुळे जिल्ह्यातील निसाका, रासाका, नासाका, वसाका, गिसाका हे सर्व साखर कारखाने मागील काही वर्षांपासून बंद आहेत. केवळ कादवा सहकारी साखर कारखाना सुरू आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील संगमनेर, लोणी, कोळपेवाडी, प्रवरा येथील साखर कारखान्यांना त्यांचे गाळप पूर्ण होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होऊ लागला आहे. जिल्ह्यात आडसाली उसाला चांगला उतारा मिळत असल्याने हे कारखाने हंगामाच्या सुरुवातीलाच येऊन येथील ऊस घेऊन जातात. मात्र खोडवा तोडायला टाळाटाळ केली जाते. यामुळे शेतकºयांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. पण उसाशिवाय शाश्वत पिकाचा दुसरा पर्याय नसल्याने ऊस घ्यावा लागतो, असे निफाड तालुक्यातील शेतकºयांनी सांगितले------------------थेट दिल्ली, इंदूरपर्यंत जातो निफाडचा ऊसमागील दोन वर्षे दुष्काळ असला तरी निफाड तालुक्यातील कादवा आणि गोदावरी नदी परिसरातील गावांमधील शेतकºयांना उसाने आधार दिला. जनावरांना चारा म्हणून कसमादे भागातील अनेक शेतकºयांनी निफाडमधून ऊस नेला. त्यावेळी तब्बल चार हजार रुपये गुठ्यांपर्यंत उसाला भाव मिळत होता. उसाची कुट्टी करून जनावरांना घातली जाते. इतकेच नव्हे तर रसवंतीसाठी जिल्ह्यातील उसाला चांगली मागणी आहे. निफाड तालुक्यातून थेट दिल्ली, इंदूरपर्यंत रसवंतीसाठी ऊस जातो. रसवंतीला जाणाºया उसाला बांडीसह भाव मिळतो.-----------------आमच्या भागात दव जास्त पडत असल्याने द्राक्ष होत नाही त्यामुळे उसाशिवाय पर्याय नाही. उसापासून वर्षाकाठी चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे ऊसलागवड परवडते. उसासाठी कारखान्यांकडून काही प्रमाणात भांडवल मिळते त्यामुळे शेतकºयांना आधार मिळतो. त्यामुळे शेतकरी ऊसलागवड करत असतात.- रतन वडघुले, ऊस उत्पादक, जळगाव, ता. निफाड
साखर कारखान्यांना टाळे लागूनही जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्रात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 9:30 PM