दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ
नाशिक : शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडू लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांच्या राहत्या इमारती, बंगल्यांसमोरून चोरटे दुचाकी गायब करू लागल्याने पोलिसांच्या गस्तीविषयी संशय व्यक्त केला जात आहे.
---
सावतामाळी रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य
नाशिक : डीजीपीनगर-१कडून वडाळागावाकडे जाणाऱ्या संत सावता माळी कॅनॉल रस्त्यावरील चौफुलीच्या परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या भागातील पथदीप तातडीने दुरुस्त करण्याची मागणी त्रस्त वाहनचालकांकडून केली जात आहे.
---
वडाळा रस्त्याचे काम रेंगाळले
नाशिक : वडाळागावातील गौसिया मशिदीपासून पुढे थेट पांढरी आई देवी चौकापर्यंतचा मुख्य रस्ता विकसित केला जात आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून या रस्त्याचे काम रेंगाळल्याने नागरिकांची सोय होण्याऐवजी गैरसोयच अधिक होत आहे. रस्त्यावर आता खडी पसरविण्यात आल्याने येथून ये-जा करणेही कठीण झाले आहे. तातडीने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी त्रस्त रहिवाशांनी केली आहे.
---
वडाळागावात डासांचा वाढता उपद्रव
नाशिक : वडाळागाव परिसरात मागील काही दिवसांपासून डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नागरिकांना दिवसरात्र घरात डास प्रतिबंधात्मक गुडनाइट, मोर्टीनसारख्या कॉइल, लिक्विडचा वापर करावा लागत आहे. गावातील सर्वच परिसरात सलग काही दिवस युद्धपातळीवर डास प्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणी करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.