लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात मान्सूनपुर्व पावसाने लावलेली हजेरी व त्यापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाने तयार झालेले वातावरणामुळे झालेली अतिवृष्टी पाहता जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ होण्यास मोठा हातभार लागणार असून, यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत चारपट म्हणजेच ३१ टक्के जलसाठा सध्या धरणांमध्ये उपलब्ध आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापुर धरणात ४७ तर दारणा धरणातही ५६ टक्के इतका समाधानकारक साठा असल्यामुळे तुर्त पाण्याचे संकट टळल्याचे सरकारी यंत्रणेचे म्हणणे आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांचा साठवण क्षमता ६५,८१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, गेल्या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फक्त ५१३२ इतका जलसाठा होता. धरणाच्या क्षमतेच्या तुलनेत गेल्या वर्षी फक्त ८ टक्के साठा असताना यंदा मात्र धरणामध्ये २०३९४ दशलक्ष घनफूट इतका ३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मान्सूनपुर्व पावसाने लावलेली हजेरी व निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पुर परिस्थिती निर्माण झाली असून, जमीनीत मोठ्या प्रमाणात पाणी मुरल्याने यापुढे पावसाचे पाणी थेट धरणांना जावून मिळण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. बुधवारी झालेल्या पावसामुळे अजून पाणी धरणापर्यंत पोहोचलेले नसले तरी, गोदावरी, दारणा व कादवा अशा तिन्ही नद्यांचे नांदुरमध्यमेश्वर बंधा-यात पाणी जमा होत असल्याने व तो शंभर टक्के पुर्णपणे भरल्याने बुधवारी रात्रीपासूनच या बंधा-यातून २०,४७४ दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याचे विसर्ग केले जात आहे. हे पाणी कोपरगाव मार्गे मराठवाड्याकडे झेपावेल.नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाºया गंगापूर धरणात ४७ टक्के इतका जलसाठा असून, धरण समुहात ३५ टक्के पाणी आहे. तर सर्वात मोठे दारणा धरणात सर्वाधिक म्हणजे ५६ टक्के, तर चणकापूर २७, हरणबारी ३२, गिरणा ३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे.