नाशिक : नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता झाल्यानंतर नाशिककरांना कोजागरी पौर्णिमेचे वेध लागले असून, शनिवारी (दि. १५) शहरात कोजागरी पौर्णिमेनिमित्त उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे.खास कोजागरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुग्ध व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात दुधाचा साठा केला असून, आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला दूध मिळेल अशी खबरदारीदेखील या व्यावसायिकांनी घेतली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने चारा टंचाई जाणवत नसून दुधाच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसते आहे. यावर्षी म्हशीच्या दुधाची ६५ ते ७० रुपये प्रतिलिटर, तर गायीच्या दुधाची ४० ते ५० रुपये प्रति लिटर या दराने विक्री होत असल्याचे विविध भागांतील दूध विके्रत्यांनी सांगितले. कोजागरी पौर्णिमेला दुधाला मागणी असल्याने पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारपासून ग्राहकांनी जादा दूध खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. कोजागरी पौर्णिमेला दुग्धव्यावसायिकांकडे दूध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने तसेच दुधाच्या मर्यादित साठ्यामुळे ग्राहकांना वेळेवर दूध उपलब्ध होत नसल्याने व्यावसायिकांनी शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस दुधाचा अतिरिक्त साठा केला आहे. कुटुंब सदस्यांप्रमाणेच कार्यालयीन कर्मचारी, मित्र-मैत्रिणींचे ग्रुप्स, विविध सामाजिक संस्था आदिंकडून कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोजागरीला दुधाच्या मागणीत वाढ
By admin | Published: October 15, 2016 2:09 AM