नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून अद्यापपर्यंत जोरदार पाऊस सुरू आहे. केवळ गंगापूर धरणाच्याक्षेत्रात मंगळवारी सकाळपर्यंत २३८ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच मंगळवारी सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत ६४ मि.मी पाऊस केवळ गंगापूरच्या क्षेत्रात नोंदविला गेला. त्यामुळे पाण्याची जोरदार आवक धरणात पाणलोटक्षेत्रातून होऊ लागल्याने दुपारपासून पुन्हा विसर्गात वाढ करण्यात आली असून सध्या ८ हजार ८३३ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरीची पुराची पातळी वाढली आहे. पाणलोटक्षेत्रात असाच पाऊस सायंकाळपर्यंत सुरू राहिल्यास धरणातून विसर्ग वाढविला जाणार असल्याची माहिती पूर नियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा दुपारपर्यंत ८४.५१ टक्के इतका असून धरणात ४ हजार ७५८ दलघफूपर्यंत पाणयाची पातळी वाढली आहे.
सोमवारी दुपारी दोन वाजेपासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात एक हजार क्यूसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे सायंकाळपर्यंत पारंपरिक पर्जन्यमापक असलेल्या दुतोंड्या मारुतीची मूर्ती कमरेपर्यंत बुडाली. सायंकाळी सहा वाजता ६ हजार ५०० क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरी नदीला या हंगामातील पहिला पूर आला. सोमवारी रात्री आठ वाजेपासून ७ हजार ८३३ क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविला गेला. मंगळवारी (दि.३०) दुपारी दोन वाजता एक हजाराने वाढ करण्यात येऊन विसर्ग ८ हजार ८३३ क्युसेकपर्यंत पाणी धरणातून सोडले जात आहे. शहरातदेखील संततधार सकाळपासून सुरू असल्यामुळे अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे रामकुंडात ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी प्रवाहित आहे. त्यामुळे गोदावरीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सायखेडा, चांदोरी या भागातदेखील गोदावरीची पातळी वाढली असून सायखेड्याच्या धोकादायक पुलाला पूराचे पाणी लागले आहे. तसेच गोदाकाठावरील दुतोंड्या मारूतीच्या मुर्तीच्या छातीपर्यंत पाणी लागले आहे. नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू पुलाला पाणी लागले आहे. या पूलावरूनही प्रवेश बंद करण्यात आला आहे. पूर बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या पूलांवर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.