नाशिक : महापालिकेने पुणे येथील मेलहॅम आणि फ्रान्स येथील आयकॉस यांनी संयुक्तरीत्या स्थापन केलेल्या कंपनीला तीस वर्षांच्या कराराने खतप्रकल्प चालविण्यास दिल्यानंतर गेल्या दीड-दोन महिन्यांत शहरातील कचरा संकलनात वाढ झाली असून, खतप्रकल्पावरील बंद पडलेल्या यंत्रणाही कार्यान्वित होत आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने नाक दाबल्यानंतर महापालिकेने खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण करत जानेवारीत खतप्रकल्प हस्तांतरित केला होता. लवादाच्या आदेशानुसार, सदर प्रकल्प सहा महिने सुरळीत चालून दाखविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. राष्ट्रीय हरित लवादाने खतप्रकल्पाच्या दुरवस्थेला महापालिकेला जबाबदार धरत शहरातील बांधकाम परवानग्यांवर रोख लावला होता. त्यामुळे दीड-दोन वर्षे शहरातील बांधकाम व्यवसाय ठप्प झाला होता. दरम्यान, अभिषेक कृष्ण यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खतप्रकल्पाच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला गती दिली. सदर प्रकल्प सुरळीत चालू ठेवण्याची हमी दिल्याने लवादाने काही अटी-शर्ती शिथिल करत बांधकाम परवानग्यांचा मार्ग मोकळा केला. महापालिकेने जानेवारी २०१७ पासून खतप्रकल्प पुणे येथील मेलहॅम आणि फ्रान्स येथील आयकॉस यांनी संयुक्तरीत्या स्थापन केलेल्या ‘नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड’ या स्पेशल परपज व्हेइकल कंपनीकडे हस्तांतरित केला. त्यानुसार, गेल्या दीड-दोन महिन्यांत खासगी कंपनीमार्फत खतप्रकल्पाचे व्यवस्थापन चालविले जात असून, खतप्रकल्पात बऱ्याच सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे खतप्रकल्पावर दैनंदिन कचरा संकलनातही सुमारे ३० ते ३५ टनांनी वाढ झालेली आहे. यापूर्वी, खतप्रकल्पावर प्रतिदिन ३९० ते ४०० मे. टन कचरा संकलित होत असे, परंतु आता प्रतिदिन ४३० ते ४३५ मे. टन कचरा खतप्रकल्पावर आणला जात आहे. महापालिकेने नवीन घंटागाड्यांचाही ठेका दिल्याने त्याचाही चांगला परिणाम कचरा संकलनावर दिसून येत आहे. खतप्रकल्पावर संबंधित खासगी कंपनीने काही सुधारणांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी, खतप्रकल्पावर कचरा जसा येईल त्यावर थेट प्रक्रिया केली जात होती, परंतु आता खतप्रकल्पावर येणाऱ्या कचऱ्याची तीन मोठ्या चाळण्यांमार्फत चाळणी होऊन त्यातून प्लॅस्टिक, दगड-माती तसेच ओला कचरा अलग केला जात आहे. याशिवाय, खतप्रकल्पातील बंद पडलेली जनावरांची विद्युत दाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे, तसेच कांडी कोळशाचा प्रकल्पही दुरुस्त करण्यात आला आहे. कंपनीने पोकलॅनसह काही वाहनेही तैनात ठेवली असून, खतप्रकल्पाच्या जागेत उद्यान साकारण्याचेही काम सुरू आहे. खतप्रकल्प सुरळीत चालू राहिल्यास हरित लवादाच्या अटीही पूर्णपणे शिथिल होणार असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
खतप्रकल्पावर कचरा संकलनात वाढ
By admin | Published: March 23, 2017 1:12 AM