नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहाटेपासून पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांवर पोहचला आहे. अवघ्या पंधरवड्यात ५० टक्के धरण भरले असून सकाळी अकरा वाजेपासून सातत्याने धरणातून विसर्ग सुरू आहे. सुरूवातील १५७२ क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. त्यानंतर पुन्हा तासाभराने ३१४४ क्सूसेकने विसर्ग वाढविला व दूपारी एक वाजता विसर्ग ४७१६ क्यूसेकवर पोहचला आहे. यामुळे गोदावरीच्या पातळीत अचानकपणे वाढ झाली आहे. गोदाकाठालगतच्या रहिवाशांना नाशिक महापालिकेच्या अग्निशामक आपत्ती व्यवस्थापनाकडून सतर्क तेच्या सूचना दिल्या जात आहे. गोदाकाठापासून सुरक्षित अंतरावर स्थलांतरीत होण्याबाबात अग्निशामक दलाकडून आवाहन केले जात आहे. शहरातील सातपूर, पंचवटी, शिंगाडा तलाव, नाशिकरोड, अशा सर्वच उपकेंद्रातील प्रत्येकी एक बंब गोदाकाठाच्या परिसरात धोक्याचा इशारा देत गस्त करत आहे. गंगापूर धरणातून सुरू करण्यात आलेला विसर्ग पंचवटी येथील रामकुंडात दुपारी अडीच वाजेपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुरनियंत्रण कक्षासह जिल्हाधिकारी आपत्ती कक्ष, महापालिका आपत्ती कक्षाला सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.