साकोरा : श्रावण महिन्यातील शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने गिरणा धरणाच्यापाणीपातळीत वाढ झाली असून, खरीप हंगामातील पिकांना संजीवनी मिळाली आहे, तर गिरणा धरणात सद्य:स्थितीत ५८.८० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव तालुक्याबरोबरच जळगाव जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरलेल्या गिरणा धरणाने पन्नाशी ओलांडली असून, परिसरातील बळीराजा सुखावला आहे. गतवर्षी तब्बल ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गिरणा धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्नाबरोबरच सिंचनाचा प्रश्नदेखील मिटला होता. गेल्या आठवडाभरात गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच नदीच्या उगम क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हरणबारी, ठेंगोडा बंधारादेखील शंभर टक्के भरले आहे. गिरणा डॅम ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरल्याने नांदगाव शहरासह तालुक्यातील ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेबरोबरच मालेगाव शहरासह तालुक्यातील दहीवाळ, कळवाडीसह पाणीपुरवठा योजना १२ खेडी पाणीपुरवठा योजना तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरासह अनेक गावांना पाणीपुरवठाकरणाºया ग्रामपंचायतीच्या सर्व योजनांना संजीवनी मिळणार आहे.
गतवर्षी गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने नाशिक व जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांच्या पाणीप्रश्नाबरोबरच सिंचनाचा प्रश्नदेखील मोठ्या प्रमाणावर निकाली निघाला होता. यावर्षीदेखील गिरणा धरण शंभरी गाठेल असा विश्वास आहे. अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नही निकाली निघण्यास मदत होणार असून, शेतपिकांचा रब्बी हंगामदेखील मोठ्या प्रमाणात बहरण्यास मदत होणार आहे.- एस. आर. पाटील, शाखा अभियंता, गिरणा धरण
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये बळीराजाने पिकवलेल्या शेतमालाला पाहिजे तसा बाजारभाव न मिळाल्याने बळीराजा नाराज झाला होता. मात्र यावर्षी धरण शंभर टक्के भरणार असून, पुन्हा आम्ही शेतकरी जोमाने घाम गाळून चांगल्या प्रकारे धनधान्य पिकवू. शासनाने चांगला बाजारभाव द्यावा अशी अपेक्षा.- भिकन पगार, शेतकरी