नाशिकरोड : नाशिक जिल्ह्यातील दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता महाविद्यालयांतील अनुदानित तुकड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.मनविसेच्या वतीने तावडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यात १०वीच्या परीक्षेत ७९ हजार १५४ विद्यार्थी उत्तीर्ण तर, ८ हजार ७६५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा त्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून महिनाभरात घेण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची संख्या लक्षात घेता महाविद्यालयांच्या अनुदानित तुकड्यांमध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे खासगी महाविद्यालयांत भरमसाठ डोनेशन घेऊन विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या अनुदानित तुकड्यांमध्ये वाढ करावी. तसेच फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देताना अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर मनविसे लोकसभा अध्यक्ष अतुल धोंगडे, संदीप भवर, गणेश मोरे, ललित ओहोळ, शशिकांत चौधरी, कशिश असरानी आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
अकरावीच्या अनुदानित तुकड्या वाढवाव्यात
By admin | Published: June 25, 2016 10:07 PM