चांदवड - चांदवड तालुक्यातील वाढता कोरोनाबाधितांचा आकडा हा काळजीचा विषय ठरत आहे. मात्र यासाठी मुंबई-पुण्यासह इतर ठिकाणाहून येणाऱ्या पाहुणे मंडळींचा पाहुणचार करणे, आपल्या नातेवाईकांना आपल्याकडे राहु देण्याचे किती गंभीर परिणाम होतात. हे चांदवड येथील कोरोना बाधीत रुग्णाच्या आकड्याच्या उदाहरणावरुन दिसून येते.
नातेसंबध टिकवणे महत्वाचे आहेच. परंतु कोरोनासारख्या अती संसर्गाजन्य आजाराच्या साथीमध्ये नातलंगाना विनंती करावी की आपण आहात तिथेच थांबा परिणामी आपल्या कुंटूबीय व सर्व समाज घटकांच्या जीवीताचा मोठा धोका संभवू शकतो.तर त्यांची माहिती प्रशासनापासून लपवून ठेवणे कारणीभूत ठरत असल्याचे काही घटनांतून निदर्शनास आल्याची माहिती प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगीतले.चांदवड तालुक्यातील धोडंबे, पाथरशेंबे आणि आता चांदवड येथील कोरोनाबाधित व्यक्तींची हिस्ट्री बघता ही सर्व मंडळी तालुक्याबाहेरून आलेली आहे. पैकी मोरे मळा चांदवड येथे पाहुणा म्हणून आलेल्या ५९ वर्षीय व्यक्तीचा दि. १६ रोजी मृत्यू झाल्याने त्याचा स्वब घेण्यात आला होता.
दि. १८ रोजी त्या मृत व्यक्तीचा अहवाल पॉझटिव्ह आल्याने तो मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याचे उघड झाल्यानंतर चांदवडकरांच्या चिंतेत भर पडली आहे.तर या पाहुण्यामुळे त्यांच्या नातलंगाच्या परिवारातील पाच जण कालच पॉझिटिव्ह आल्याने चांदवडकरांची चिंता वाढली. त्या मृत व्यक्तीवर शासकीय नियमांप्रमाणे त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान वरील तीन गावे उदाहरण म्हणून असली तरी तालुक्यात मोठया प्रमाणात पाहुण्यांचे इन्कमिंग झाले आहे, ज्याची माहिती नागरिक गावात संबधित व्यक्तींशी वाद नको म्हणून प्रशासनाला देत नसल्याचे देखील उघड झाले आहे.
यामुळे आगामी काळात प्रशासनापासून माहिती लपवून ठेवत पाहुणे मंडळींचा पाहुणचार करणे हे तालुक्यासाठी डोकेदुखी ठरू शकते.असेही प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, तहसीदार प्रदीप पाटील यांनी सांगीतले.