नाशिक : गत महिन्यापासून लसींच्या उपलब्धतेत काहीशी सुधारणा झाल्याने जिल्ह्यातील सुमारे १४ लाख नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे. त्यात सुमारे ३२ टक्के नागरिकांनी खासगी रुग्णालयांत लस घेतली आहे. तर शासकीय केंद्रांवर मोफत लस घेणाऱ्यांची संख्या ६८ टक्के इतकी आहे. मात्र, शासकीय केंद्रांवर मिळणारा अपुरा लससाठा आणि तेथे होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेक मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय नागरिकांकडून आता खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन लस घेण्याकडील कल वाढू लागला आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी एप्रिल महिन्यापासूनच खऱ्या अर्थाने थोड्या अधिक प्रमाणात लस उपलब्ध होऊ लागल्या. मे महिन्यापासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणास परवानगी दिल्यानंतर त्या वेगात अजून वाढ झाली. मात्र, तरीदेखील बहुतांश शासकीय केंद्रांवर शंभर-दीडशेपेक्षा अधिक लसीकरण होत नाही. त्यामुळे त्या केंद्रांवर रांगा लावणाऱ्या उर्वरित तीनशेहून अधिक नागरिकांना माघारी फिरावे लागते. कधी तर संपूर्ण महापालिका तसेच जिल्ह्यातील अन्य शासकीय केंद्रांवरील लसींचा साठाच संपुष्टात आल्यानंतर दोन ते तीन दिवस लसीकरण ठप्पच असते. मात्र, जिल्ह्यातील १४ लाख लसीकरणात शासकीय रुग्णालयांमधील लसीकरण हे खासगी रुग्णालयातील लसीकरणाच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे. सरकारी रुग्णालयात १ ते २० जून या दरम्यान कमी-जास्त प्रमाणात लसीकरण सुरू होते. हे चित्र २१ जूननंतर पालटले असून, त्या ठिकाणी लसीकरणाला वेग आल्याचे दिसते. मात्र, २८ जूननंतर पुन्हा सरकारी केंद्रांमध्ये लसीकरणाचा वेग कमी झाल्याचे पाहायला मिळते. त्या तुलनेत खासगी रुग्णालयांत थेट कंपन्यांकडून लस उपलब्ध झाल्याने त्यांच्याकडील लसीकरणाचा वेग महिनाभर कायम होता. जून महिन्याच्या प्रारंभापासूनच खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाला वेग येऊ लागला आहे. त्यात आता खासगी रुग्णालयांमध्ये स्पुतनिक व्ही लसदेखील उपलब्ध होऊ लागल्याने नजीकच्या काळात हा वेग अजून वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कोरोना काळातदेखील सुमारे ६५ टक्के रुग्णांनी शासकीय रुग्णालयांत उपचार घेतले. तर खासगी रुग्णालयांत ३५ टक्के रुग्णांनी उपचार घेतले. त्याप्रमाणेच साधारणपणे लसीकरणाचे प्रमाण भविष्यातही कायम राहण्याचीच शक्यता आहे. सरकारची लस वाईट आणि खासगी रुग्णालयांची लस चांगली, असा कोणताही फरक नाही. मात्र, उपचारांबाबत तयार झालेला पॅटर्न लसीकरणामध्ये कायम राहण्याची शक्यता आहे.
इन्फो
लसीबाबत नोंद केल्यानंतर ती हमखास मिळण्याचा विश्वास नागरिकांना वाटतो. तसेच लसीकरणाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीतील संभाव्य संसर्गाचा संबंध निश्चितपणे टाळणे शक्य होत असल्याने खासगीत लस घेण्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.
इन्फो
प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण होणे आवश्यकच आहे. हे आता सर्व नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे लसीकरण व्हायचे बाकी असल्यास ते खासगीत जाऊनदेखील घेण्यास नागरिकांकडून प्राधान्य दिले जात आहे.
कोट
ज्या नागरिकांना कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयांत उपचार घेणे परवडले होते किंवा नियमितपणे खासगीतच उपचार घेतात त्यांना लस घेण्यास परवडू शकते, त्यामुळे त्यांनी खासगीतच लस घेण्यास प्राधान्य द्यायला हवे.
मकरंद जोशी, नागरिक
-----
इन्फो
सरकारी रुग्णालयांत जाऊन रांगेत उभे राहणे अनेकांना पसंत पडत नाही. तेथे जाऊन लस मिळेल का, अशीही शंका असते. त्यामुळे खासगीमध्ये थोड्याफार प्रमाणात पैसे गेले, तरी लस मिळण्याची शाश्वती असल्याने शासकीय रुग्णालयात लस घेणेही नको.
जयेश शाह, नागरिक
-------
ही लस आहे.