पाटणे : मालेगाव तालुक्यातील पाटणे येथे १५ कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने अँटिजेन चाचणीला सुरूवात करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर या त्रिसुत्रीचा वापर करावा. घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी. तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे. कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे आढळल्यास स्वतःची अँटिजेन चाचणी करण्याचे आवाहन आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. वैशाली मंडलिक यांनी केले आहे. येथील वाढत्या कोरोना विषाणूजन्य पार्श्वभूमीमुळे आरोग्य विभागाच्यावतीने डॉ. वैशाली मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्यसेविका सुरेखा देवरे, आरोग्यसेवक अरूण पाटील, आशासेविका मनीषा त्रिभुवन, कविता खैरनार, वैशाली बागुल, जयश्री विखे या घरोघरी जाऊन तपासणी व जनजागृती करत आहेत.
-----------------------------
जंतुनाशकाची फवारणी
पाटणे उपकेंद्रात अँटिजेन चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ६० रुग्णांची अँटिजेन चाचणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीकडून गावात रिक्षा फिरवून ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने जंतुनाशकाची फवारणी केली असून, रविवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला आहे.