----
शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू
मालेगाव : तालुक्यातील स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी कुटुंब सर्वेक्षण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, अंगणवाडीसेविका घरोघरी जाऊन गावांमध्ये कुटुंब सर्वेक्षण करीत आहे. शाळेत कधीच न दाखल झालेली मुले, शाळेत न जाणारी मुले, प्राथमिक शाळेत महिन्यापेक्षा जास्त गैरहजर असलेली मुले, स्थलांतरित करणाऱ्या कुटुंबाची मुले याचा शोध घेऊन १०० टक्के मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे.
----
वनतळ्यांमध्ये पाणी टाकण्याची मागणी
मालेगाव : तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. वन्यप्राणी घोटभर पाण्यासाठी मानवी वस्तींकडे धाव घेत आहेत. यामुळे हल्ल्यांचे प्रकार वाढले आहेत. वनविभागाने जंगल परिसरात उभारलेल्या वनतळ्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणी टाकून पाण्याची उपलब्धता करुन द्यावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.
-----
सोयगाव परिसरात रस्त्यांची दुरवस्था
मालेगाव : शहरातील सोयगाव, चर्च, गवती बंगला आदी भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या मंगला बच्छाव यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सोयगाव नववसाहत परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांची चाळण झाल्यामुळे वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागत आहे.
-----
संगिनी फोरमकडून पांजरपोळला चारा उपलब्ध
मालेगाव : येथील जेएसजी संगिनी फोरम सखीच्या पदाधिकारींनी येथील पांजरपोळ गोशाळेला भेट देऊन सामाजिक बांधिलकी म्हणून गायींना चारा उपलब्ध करून दिला आहे. यावेळी अध्यक्ष शोभा पहाडे, संगीता साखला, राजश्री संचेती, प्रिया लोढा, उर्मिला पटणी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
----
मोसम नदीपात्राच्या स्वच्छतेची मागणी
मालेगाव : शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी मोसम नदी गटारगंगा बनली आहे. मोसम नदीच्या स्वच्छतेची वारंवार मागणी करूनही महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. मोसम नदी सुधार योजनाही बासणात गुंडाळण्यात आली आहे. नदीमध्ये सर्रासपणे गटारींचे पाणी सोडले जात आहे. नदीची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
----
दाभाडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
मालेगाव : मालेगाव ते दाभाडी रस्त्यादरम्यान ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागत आहे. दाभाडी वीज उपकेंद्राजवळ खड्डेात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
----
उद्यानांची साफसफाईची मागणी
मालेगाव : शहरातील राजमाता जिजाऊ उद्यानासह इतर उद्यानांची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तालुका क्रीडा संकुल, पोलीस कवायत मैदान व इतर उद्यानांमध्ये घाण कचऱ्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने याकडे सर्रास दुर्लक्ष केले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.