सटाणा : येथील बहुचर्चित एचडीएफसी बँकेच्या सटाणा शाखेतील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी दोन्ही संशयितांना दोन दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सटाणा न्यायालयाने दोन्ही संशयितांना कलम १५६ (३) अन्वये तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोपी मनोज दिलीप मेधने (रा. सरस्वती वाडी, ता.देवळा) व शरद शिवाजी आहेर (रा. सोयगाव, ता. मालेगाव) यांना अटक करून न्यायालयाने संशयीतांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. बुधवारी (दि.१७) दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर सटाणा पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही संशयितांना पुन्हा दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, सटाणा पोलिसांनी या गुन्ह्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारात अन्य लोकांच्या खात्यात पैसे वर्ग झाल्याचे समोर आले असून, या तपासाकामी दोन्ही संशयितांना अजून सात दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने पोलिसांची सात दिवस पोलीस कोठडीची मागणी अमान्य करत दोन्ही संशयितांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य सूत्रधार मनोज मेधने व त्याचा साथीदार यांनी नियोजनबद्ध पद्धतीने बागलाण तालुक्यातील तब्बल ३१ शेतकऱ्यांची व बँकेची १ कोटी ४ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली असून, दोन्ही संशयितांच्या या कृत्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेचा अपहार केला आहे.
इन्फो
मोठे मासे अडकणार?
संबंधित फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावरून सटाणा शहर व परिसरातील काही युवकांच्या बँक खात्यावर लाखो रुपये वर्ग झाले आहेत. लवकरच हे युवक पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.