नाशिक : मागील चाळीस दिवसांपासून सुरू असलेल्या संचारबंदीत काहीशी सूट मिळाल्यानंतर जिल्ह्यात काही प्रमाणात बांधकाम व्यवसाय सुरू होऊ लागला आहे. यामुळे मजूर वर्गाला दिलासा मिळाला आहे. मात्र संचारबंदी पूर्णपणे उठलेली नसल्याने बांधकाम क्षेत्राला बांधकाम साहित्याच्या दरवाढीला तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यामुळे अनेकांचे बांधकामाचे बजेट वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संचारबंदीनंतर जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. अनेकांना बांधकामे बंद करावी लागली. मागील ४० दिवसांपासून कामे बंद आहेत. संचारबंदीत काहीशी शिथिलता मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून हळूहळू कामे सुरू होऊ लागली आहेत. मोठ्या बांधकाम व्यावसायिकांची कामे अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झाली नसली तरी छोटे व्यावसायिक आणि वैयक्तिक स्वरूपातील कामे पुन्हा सुरू होऊ लागली आहेत.बांधकामासाठी लागणारे सीमेंट, स्टील , वीट, वाळू, कच या प्रत्येक साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सीमेंट गोणी ५० रुपयांनी महागली आहे तर विटांच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. स्टील आणि इतर साहित्यांच्या दरातही थोड्याफार प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे.------संचारबंदीमुळे अनेक परप्रांतीय मजूर गावी निघून गेले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेले मजूरही त्यांच्या गावी परतले आहेत. हे मजूर पुन्हा येईपर्यंत बांधकाम क्षेत्राला मजूर टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे अनेकांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बांधकामाच्या विविध साहित्यांच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 10:20 PM