पाटोदा : सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे कांदा बियाणाची अभूतपूर्व टंचाई निर्माण होऊनही येवला तालुक्यात पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे. महागड्या बियाणांमुळे कांदा उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. भरमसाठ खर्च करूनही कांदा बियाणे भेसळयुक्त निघाल्याने उत्पन्नात निम्म्याने घट आली आहे. बहुतांश कांद्याला डोंगळे, तसेच दुभाळके निघाल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला असून, तो पुरता हतबल झाला आहे. सध्या कांदा काढणीला वेग आला असून, बहुतांशी शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल असल्याचे दिसून येत आहे.पाटोदा गाव आणि परिसरात उन्हाळी कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे बाजार समित्याही काही काळ बंद राहत आहे. आजमितीस कांद्यास सरासरी पाच ते पंधरा रुपये किलोप्रमाणे बाजारभाव मिळत आहे. बाजार समित्या सुरू झाल्या तरी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाव पुन्हा कोसळण्याची भीती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे. या उन्हाळी कांद्याची टिकवण क्षमताही जास्त असल्याने व पुढील काही काळात भाव वाढेल या आशेवर शेतकऱ्यांचा कांदा चाळीत साठविण्याकडे कल वाढला आहे. साधारण कांदा काढणी व साठवणुकीची प्रक्रिया ही अजून काही दिवस सुरूच राहणार आहे.या परिसरात नगदी पीक म्हणून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात पोळ, रांगडा व उन्हाळ असे सर्वच उत्पादन या भागातील शेतकरी घेत आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे तीन ते चार वेळेस कांदा बियाणे टाकूनही रोप खराब झाल्यामुळे शेतकरी वर्गाने उपलब्ध होईल तेथून मिळेल त्या भावात बियाणे व रोप आणून कांदा लागवड केली. उन्हाळ कांद्याची लागवड ही साधारणपणे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केली जाते. मात्र, यावर्षी बियाणे, रोपामुळे फेब्रुवारीअखेरपर्यंत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. मात्र, उत्पन्नात निम्म्यापेक्षा जास्त मोठी घट आली आहे. त्यातच उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.मागील काही वर्षांपासून या भागातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कांदा चाळीत साठवून ठेवतात. मात्र, वर्षभर कांदा साठवून ठेवूनही व एकरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांना कांदा मातीमोल भावात विकावा लागतो. बाजारभाव व केलेला खर्चही निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी कांदा शेळ्या-मेंढ्यांना खाऊ घातला. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. सध्या कांद्याला पाच ते पंधरा रुपये प्रतिकिलो भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा केलेला खर्चही फिटणार नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून, आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारभावात कमालीचा चढ-उतार होत असल्याने कांदा साठवून ठेवला जात आहे. मागील वर्षी मोठ्या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र, कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. आज ना उद्या भाव वाढतील असे वाटत होते. मात्र, संपूर्ण वर्षभर कांद्याचे भाव वाढले नाहीत. साठवून ठेवलेला निम्म्यापेक्षा जास्त कांदा चाळीतच सडून गेला. कांदा मातीमोल भावात विकावा लागल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.- दौलत बोरनारे, कांदा उत्पादक, पाटोदाशेतकरी वर्गाची तारांबळसध्या शेतकरी वर्गाची उन्हाळी कांदा काढणी व कांदा चाळीत साठविण्याची मोठी लगबग सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांकडे कांदा साठविण्यासाठी चाळी नसल्याने व नवीन चाळीचे बांधकाम करण्यासाठी लॉकडाऊनमुळे साहित्य मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून झाडाच्या सावलीखाली पोळ लावून ठेवल्या आहेत. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून परिसरात कमी-अधिक प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने झाडाखालील कांदा झाकण्यासाठी शेतकरी वर्गाची तारांबळ उडत आहे.
कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ, उत्पन्नात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 12:01 AM
पाटोदा : सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे कांदा बियाणाची अभूतपूर्व टंचाई निर्माण होऊनही येवला तालुक्यात पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे. महागड्या बियाणांमुळे कांदा उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. भरमसाठ खर्च करूनही कांदा बियाणे भेसळयुक्त निघाल्याने उत्पन्नात निम्म्याने घट आली आहे.
ठळक मुद्देपाटोदा परिसर; काढणीला वेग; शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल