इंदिरानगर : गेल्या महिनाभरात इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकामागून एक सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत चालल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही दिवसांपूर्वी राजीवनगर परिसरात आपार्टमेंटमधील एका फ्लॅटचा दरवाजा ठोठावून ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी बळजबरीने ओरबडून पळ काढण्यात चोरटे यशस्वी झाले होते. या घटनेला पंधरवडा उलटत नाही तोच पुन्हा राणेनगर परिसरात पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावण्याची घटना घडली होती. या घटनांचा तपास पूर्ण होत नाही तोच शुक्रवारी (१७) लता सुधाकर करपे (६०,रा.चेतनानगर ) या ज्येष्ठ महिला चेतनानगर येथील कॅलिबर सोसायटीच्या समोरील गल्लीतून जात असताना अचानकपणे काळ्या रंगाच्या दुचाकी दुचाकीवरून दोन अनोळखी इसम आले व त्यापैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने कर्पे यांच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रुपये किमतीची २० ग्रॅमची सोन्याची पोत बळजबरी खेचून पोबारा केल्याची घटना घडली आहे. सोनसाखळी ओढताना काही भाग रस्त्यावर पडल्याने कर्पे यांना तो मिळून आला; मात्र उर्वरित सोनसाखळी घेऊन चोरटे फरार होण्यास यशस्वी ठरले.यापैकी काही भाग रस्त्यावर पडल्याने तो त्यांना सापडला इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.पोलीस गस्त कुणीकडे?एकापाठोपाठ इंदिरानगर परिसरात सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडत असताना पोलीस गस्त नेमकी कोठे घातली जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अद्याप एकाही घटनेतील संशयित पोलिसांच्या हाती लागले नसून सोनसाखळी चोरीच्या घटनाही कमी होत नसल्याने महिलावर्गांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वर्दळीच्या ठिकाणी साध्या वेशातील महिला, पुरूष पोलीसांची गस्त सुरू करण्याची मागणी होत आहे. इंदिरानगर परिसर ज्येष्ठांची वसाहत म्हणून ओळखला जाता. यामुळे चोरट्यांनी त्याचा फायदा घेत ज्येष्ठ महिला फारसा प्रतिकार करू शकत नसल्याचे लक्षात घेऊन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविण्याचा सपाटा लावला आहे.एकापाठोपाठ घटना; महिलांमध्ये भीतीइंदिरानगर परिसरात पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पळ काढण्याची मालिका सुरूच असून, या चार दिवसांत लागोपाठ दुसरी घटना रविवारी (दि.१९) घडली. चार्वाक चौकातील सप्तशृंगी सोसायटीजवळ एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. महिनाभरात सोनसाखळी चोरीच्या चार घटना घडल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुवर्णा दिलखूश घोलप (३९, रा. एमएसईबी कार्यालयजवळ, इंदिरानगर) या आपल्या कुटुंबीयांसमवेत पायी जात असताना चार्वाक चौकात एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून येत दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेल्या तरुणाने घोलप यांच्या गळ्यातील ६२ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. पाच तोळे वजनाची सोन्याची पट्टी त्यावर डिझाइन असलेले मंगळसूत्र असा हा सुमारे ६२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी गेल्याची फिर्याद घोलप यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली. शुक्रवारी याच परिसरात लता सुधाकर कर्पे या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडल्याची घटना घडली होती.
इंदिरानगर भागात सोनसाखळी चोरीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:18 AM