ओझर : एखादा गोड पदार्थ सारखा खात राहिला की त्याचा वीट येतो, मात्र भगवंताचे आणि सदगुरूंचे नामस्मरण कितीही वेळा घ्या त्याची गोडी अधिकाधिक वाढतच जाते. याला ह्यअवीटह्ण गोडी म्हणतात. ही गोडी दिवसागणिक अधिकाधिक वृद्धिंगत होत जाते. म्हणूनच म्हणतात गोड तुझं नाव देवा, गोड तुझे रूप. भाविकांनी भक्तिमार्गातील गोडी वाढवावी, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.ओझर येथील जनशांतिधाम परिसरातील निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमात सत्संग-प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा प्रारंभ ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी पठनाने करण्यात आला. यावेळी प्राणायाम, ध्यान, सार्थ एकनाथी भागवत ग्रंथाचे वाचन करण्यात आले. यानंतर आरती, सत्संग आदी सोहळा फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत संपन्न झाला. यावेळी आश्रम परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली.
स्वामी शांतिगिरी महाराज उपस्थित भाविकांना संदेश देताना म्हणाले, की आपण दुसऱ्याचे भले केले तर आपल्या जीवनातील गोडवादेखील निश्चित वाढल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याचे भले करा, दुसऱ्याचे हित जोपासा, लहानथोर, घरातील वडीलधारी मंडळी यांचा सन्मान करा. यासोबतच प्रत्येकाला अनुष्ठान करा, यज्ञ करा, जप लिहा,जप वह्या वाटा, अन्नदान करा व असे कर्म करा की जेणेकरून दुसऱ्याचे पुण्य वाढेल आणि त्यांचे भले होईल.