भगवान गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : तालुक्यात खरीप पिकांचे प्रमाण दरवर्षी कमी होत असून, फळबाग व भाजीपाल्याची लागवड वाढली असताना यंदा मात्र पूर्वहंगामी टोमॅटोसह सर्व भाजीपाला पिकांना भाव नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनाचे गणित कोलमडले आहे. आता भाजीपाल्याच्या दुसऱ्या हंगामात सोयाबीन, ऊस आणि द्राक्ष पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्याने भात लागवड उशिरा झाली. यंदा सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाला असला तरी पिके मात्र अत्यंत जोमदार आहेत. दरवर्षी खरीप पिकांची लागवड कमी होत असून, भाजीपाला लागवड वाढत आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत टोमॅटो पिकाची लागवड वाढली आहे. तालुक्यात टोमॅटो व भाजीपाल्याचे दोन हंगाम घेतले जातात. त्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला एक, तर दुसऱ्या हंगामाची लागवड नागपंचमी, पोळा दरम्यान केली जाते. यंदा पहिल्या हंगामातील टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची आदी भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला गेला. मात्र, भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तालुक्यात टोमॅटोवर प्रक्रिया करणारे तीन - चार उद्योग आहेत. मात्र, टोमॅटोला कमी भाव मिळत असल्याने हे प्रकल्प शेतकऱ्यांना फायदेशीर ठरताना दिसत नाहीत.
तालुक्यात पूर्वी ज्वारी, बाजरीचे मोठे पीक घेतले जात होते. मात्र, आता ज्वारी, बाजरी जवळपास नामशेष झाली. त्याची जागा आता मका व सोयाबीनने घेतली आहे. दिंडोरी तालुक्यात सुमारे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झालेली आहे, तर मक्याचे क्षेत्र काहीसे घटले असून, मक्यावरील रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी अन्य पिकाकडे वळत आहेत. भुईमूग हे पीक ही मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे तालुक्याच्या पश्चिम भागात भात, नागली, वरीची मोठ्या प्रमाणात लागवड होत असून, सुमारे ४,५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. कृषी विभागातर्फे एक रेषेत अत्याधुनिक भात लागवड पीक जोपासना पद्धतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. तालुक्यात ३२९ लाभार्थींनी पीक विमा काढला आहे. टोमॅटो, भाजीपाला पिकांना भाव मिळत नाही. तसेच द्राक्ष शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. मात्र, उत्पादन कमी होत असल्याने
तालुक्यात उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उसाकडे कल वाढू लागला आहे. आडसाली उसाची लागवड वाढत आहे. गतवर्षीपेक्षा ऊस लागवड व उसाचे एकरी उत्पादन वाढले आहे. सुमारे १० हजार हेक्टरवर विविध भाजीपाला पीक घेतले जात आहे. यंदा कमी पाऊस झाला असला तरी पिके मात्र जोमदार आहेत.
गेल्या पाच - सहा दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने वाघाड धरण भरण्याच्या मार्गावर आहे. इतर धरणांमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे. सुमारे १८,५०० हेक्टरवर द्राक्ष पिकांची लागवड आहे. द्राक्ष छाटणीचा हंगाम सुरू होत असून, शेतकऱ्यांची पूर्वतयारीची कामे जोरात सुरु आहेत. दरवर्षी द्राक्ष छाटणी हंगामात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने द्राक्ष उत्पादन खर्च वाढत आहे. यंदा सर्व पिके जोमदार असली तरी पहिल्या हंगामातील टोमॅटो भाजीपाल्याने निराशा केली आहे. दुसऱ्या टप्प्यातील भाजीपाला पिकांना भाव मिळण्याची, सोयाबीन भात पिकाचे अधिक उत्पादन येण्याची, द्राक्ष हंगाम कमी खर्चात येत चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेवर शेतकऱ्यांचे पीक संवर्धनाचे काम जोमात सुरू आहे.
कोट...
नाशिक जिल्ह्यात शेतकरी भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवत आहे. परंतु बाजार भाव कोसळल्याने उत्पादन खर्च निघत नाही. द्राक्षांचा खर्च परवडत नाही. यामुळे शेतकरी आता भाजीपालावर्गीय फळपिके घेऊ लागला आहे. त्यात खासकरून कोबी, टोमॅटो, शिमला मिरची, साधी तिखट मिरची, कलिंगड, गिलके, कारले, कोथिंबीर, खरबूज, फ्लाॅवर अशी पिके घेत आहेत. या भाजीपाल्याला बाजारभाव मिळाला नाही तर बॅंकांचे कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
- सोमनाथ मुळाणे, प्रगतशील शेतकरी, खतवड
140921\14nsk_50_14092021_13.jpg
सोयाबीन पीक