दरम्यान, व्हेंटिलेटरची सुविधा सुरू करण्यासाठी इलेक्ट्रिकचे काम रखडले होते. आता त्या कामाला गेल्या दोन दिवसांपासून चालना मिळाली असल्यामुळे व्हेंटिलेटर केव्हा सुरू होते याकडे लक्ष लागले आहे.
सद्य:स्थितीत कळवण तालुक्यात ४३६ बाधित रुग्ण असून ज्येष्ठ नागरिक, महिलांसह तरुणांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. एकीकडे रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असताना कोविड रुग्णांसाठी असलेल्या सुविधा मात्र खूपच तोकड्या असल्याचे विदारक चित्र कळवण तालुक्यात दिसून येत आहे. अनेक शासकीय इमारती तालुक्यात उपलब्ध असूनही केवळ आरोग्य सुविधांसह मनुष्यबळ यंत्रणा उपलब्ध नसल्याने अत्यवस्थ रुग्णांना नाशिक, मालेगावसारख्या ठिकाणी हलवावे लागत आहे. मात्र तेथेही बेड्स उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संकटात सापडत आहेत. सुविधांच्या अभावामुळे अनेक रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतरही प्रकृती खालावल्यास रुग्णाला इतरत्र हलवावे लागत असल्याने रुग्णाच्या नातेवाइकांची दमछाक होत असून शहरात लवकर बेड्स उपलब्ध होत नसल्याने ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकाच कुटुंबातील अनेक जण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही जास्त असल्याने अत्यवस्थ रुग्णासाठी धावपळ करण्यास कुणी नसते. त्यामुळेदेखील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
कळवण तालुक्यात उपजिल्हा दर्जाचे रुग्णालय आहे. तर दोन डेडिकेटेड कोविड केअर सेंटर आणि एक कोविड केअर सेंटर आहे. मात्र बेड्सची मर्यादा आणि रुग्णसंख्येत होत असलेली वाढ यात बरीच तफावत होत असल्याने प्रशासनाने आता सुविधा वाढवण्याकडे लक्ष द्यायला हवे, अशी आर्त साद रुग्णांच्या नातेवाइकांकडून प्रशासनाला घातली जात आहे.
इन्फो
व्हेंटिलेटर्स बनली शोभेची
मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार व्हेंटिलेटर उपलब्ध होऊनही वर्षभरात ते कार्यान्वित झाले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून हे व्हेंटिलेटर शोभेचे बाहुले झाल्याने व्हेंटिलेटरसाठी रुग्णांना नाशिक, मालेगाव येथे हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र आहे. व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यात दिरंगाई होत असल्याने त्याचा जाब आमदार नितीन पवार यांनी प्रशासनाला विचारत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
इन्फो
ऑक्सिजन बेड पडताहेत तोकडे
एकीकडे रुग्णसंख्या पाचशेच्या पुढे चालली असताना सुविधांमध्ये मात्र वाढ होत नसल्याचे गंभीर चित्र कळवण तालुक्यात दिसून येत आहे. बहुतांश रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याने त्यांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासत आहे. कळवण तालुक्यात अभोणा येथे ३० ऑक्सिजन बेडचे १०० बेडमध्ये तर मानूर येथे ३५ ऑक्सिजन बेडचे १०० बेड डीसीसी सेंटरमध्ये रूपांतर करण्याची मागणी आमदार नितीन पवार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.