मालेगाव : शहराची सध्याची व भविष्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी गिरणातून ४०० दलघफू पाणी, तर चणकापूर धरणामधूम एक आवर्तन वाढवून द्यावे, अशी मागणी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत आमदार मुफ्ती यांनी हद्दवाढीत समाविष्ट सात गावांमुळे मालेगावची लोकसंख्या सुमारे साडेसात लाखांच्या झाली आहे. वाढती लोकसंख्या पाहता मिळणारे पाणी शहराला कमी पडत आहे. गिरणा धरणाची क्षमता २१ हजार ५०० दलघफू आहे. मालेगावसाठी ९०० दलघफू पाणी मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात ६०० दलघफू पाणी मिळत आहे.परिणामी शहरातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे ४०० दलघफू पाणी वाढवून ते किमान एक हजार एमसीएफटीकरावे. चणकापूर धरणातून १६०० दलघफूची मागणी असताना केवळ १४०० एमसीएफटी पाणी दिले जाते. जुलै २०२० पर्यंत चार आवर्तनांची मंजुरी आहे. पाणीटंचाईचाविचार करता एक आवर्तन वाढून द्यावे, अशी मागणी आमदार मुफ्ती यांनी केली.तळवाडे साठवण तलावाची क्षमता वाढली तरी हे पाणी केवळ ७० ते ७५ दिवसच पुरते. पालकमंत्री भुजबळ यांनी संबंधित विभागाकडून माहिती मागवून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बैठकीस पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कालवा सल्लागार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.भायगाव, सोयगाव, कलेक्टरपट्टा, द्याने, म्हाळदे, दरेगाव, सायने ही सात गावे २०११ ला महापालिकेत समाविष्ट झाली. लोकसंख्या वाढल्याने पाण्याचा वापर व मागणी वाढत आहे. चणकापूरची २० किलोमीटर अंतराची जलवाहिनी ४० वर्षे जुनी आहे. परिणामी अनेक ठिकाणी पाणीगळती होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. या सर्व बाबींचा विचार करून वाढीव पाणी देण्यास मंजुरी देत नवीन जलवाहिनीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी आमदार मुफ्ती यांनी केली आहे.
पाण्याचे आवर्तन वाढवून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:01 AM
मालेगाव शहराची सध्याची व भविष्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी गिरणातून ४०० दलघफू पाणी, तर चणकापूर धरणामधूम एक आवर्तन वाढवून द्यावे, अशी मागणी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली आहे.
ठळक मुद्देमौलाना मुफ्ती मो. इस्माईल : कालवा सल्लागार समितीची बैठक