वाडीवऱ्हे वीज वितरण केंद्रावर वीज कोसळल्यामुळे अनेक गावे अंधारात
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात शुक्रवारी पुन्हा एकदा पावसाचा जोर सुरूच आहे. तालुक्यातील ब्रिटिशकालीन दारणा तसेच भावली या दोन धरणांमधील पाण्याच्या पातळीने अचानक उसळी घेतली. सकाळी दारणा ७४.२० टक्के तर भावली धरण ८६.४४ टक्के भरले आहे. ही दोन्हीही धरणे ओव्हरफ्लोच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान शुक्रवारी सकाळी ११ वाजता दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा अंदाज बघून जलाशयातून विद्युतग्रहाद्वारे सुमारे ६७० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात पावसाचे प्रमाण व धरणातील पाण्याची उपलब्धता बघूनच दारणा धरणातून अतिरिक्त किती व कधी पाणी सोडायचे याचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी शक्यता आहे. दारणा धरणात ७ हजार १४९ पैकी ५ हजार २४० दलघफु इतका उपयुक्त पाण्याचा साठा तयार आहे. तर भावली धरणाची ओव्हरफ्लो च्या दिशेने जोरात वाटचाल सुरु आहे. दारणा देखील कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. त्यामुळे प्रशासनाने लाभ क्षेत्रातील गावांना आतापासूनच सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा दिला आहे.
------------------------
नऊ गावे २४ तासांपासून अंधारात
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नऊ गावे जवळपास कालपर्यंत अंधारात होती. पूर्व भागातच नव्हे तर तालुक्यात इतर बऱ्याच ठिकाणी बत्ती गुल झालेली होती. सर्वसामान्य नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात खंडित वीजपुरवठ्याची समस्या बघायला मिळते. बुधवारी सायंकाळी सर्वत्र वीज चमकत होती. त्यातील एक वीज वाडीव-हे येथील वीज वितरण उपकेंद्रातील वीजप्रणालीवर कोसळली. त्यात बरीच जाळपोळ झाल्याने कर्मचाऱ्यांची सर्वत्र एकच धावपळ उडाली होती. त्यामुळे उपकेंद्राच्या अंतर्गत गोंदे दुमाला, मुकणे, पाडळी देशमुख, जानोरी, अस्वली स्टेशन, कुऱ्हेगाव, बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्य, नांदगाव बुद्रुक आदी गावांचा तसेच गोंदे औद्योगिक वसाहतीचा वीजपुवठा खंडित झाला होता. याबाबत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपकेंद्राचे उपअभियंता धवल आगरकर आणि त्यांची संपूर्ण टीम पहाटेपासून कार्यरत होती. वीजपुरवठा तत्काळ सुरु व्हावा यासाठी वीज वितरणचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
--------------------
वीज ग्राहकांनी शेतीपंप तसेच घरगुती बिले भरून वीज वितरणला सहकार्य केल्यास अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या वीजतारा, रोहित्र तसेच इतर कामे करण्यास हातभार लागेल. यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सहकार्य मिळेल.
- धवल कुलकर्णी, उप अभियंता, वाडिव-हे वीज केंद्र
---------------------
दारणा धरणातून ६७० क्युसेकने होत असलेला विसर्ग. २) वाडिव-हे वीज केंद्रावर वीज पडल्यामुळे वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेताना. (२३ दारणा, २३ नांदूरवैद्य)