उन्हाळी कांद्याचे भाव ७०००पर्यंत पोहोचले होते. चांगल्या भावामुळे बळीराजा काही दिवस थोडा सुखावला होता. पुढील पिकासाठी भांडवल म्हणून याचा उपयोग होईल, या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा टप्प्याटप्प्याने विकण्याचे नियोजन केले. मात्र, केंद्राने निर्यातबंदी केल्याने दिवसेंदिवस भावात घसरण होत गेली आणि शेवटी भाव हजार-पंधराशे रुपयांवर येऊन ठेपला. कांद्याचे भाव कोसळल्याने सर्व नियोजन विस्कळीत झाले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. दोन पैसे हाती येतील व रब्बी पिकाची लागवड होईल, या भोळ्या आशेवर असणारा बळीराजा मात्र सुलतानी आणि अस्मानी संकटाचा बळी ठरला आहे.
कांद्याचे रोप पावसामुळे आधीच खराब झाले. त्यातच बियाणांचा तुटवडा जाणवत होता. शेतकऱ्यांनी जवळजवळ चार हजार रुपये किलो दराने बियाणे खरेदी करून, रोपे तयार करण्यासाठी बियाणे टाकले. मात्र, सततच्या बदलत्या वातावरणामुळे अनेक बुरशीनाशकांचा वापर करूनही करपा आणि मर रोग आटोक्यात येत नाही.
कांद्याचे रोप विविध रोगांना बळी पडत आहे. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे.काय करावं, कोणत्या औषधांची फवारणी करावी हेही कळेनासे झाले आहे. रोप खराब होत असल्याने अपेक्षित क्षेत्रात कांद्याची लागवड होणार नाही. उरलेल्या क्षेत्रात कोणते पीक घ्यायचे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
एकूणच बदलत्या ढगाळ, रोगट वातावरणामुळे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांच्या हाती काही लागेल की नाही, याची शाश्वती दिसत नाही. बळीराजा मात्र सुलतानी आणि अस्मानी संकटाचा मुकाबला कसा करावा, या समस्येने हैराण झाला आहे.