पिंपळगाव बसवंत : शहर परिसरात मोकाट जनावरे व भटक्या श्वानांचीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांच्या सुरक्षेसह जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोकाट जनावरांमुळे व श्वानांच्या उपद्रवामुळे शहरातील नागरिक त्रस्त असून या जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी पिंपळगाव बसवंत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत प्रशासन व सरपंच अलका बनकर, सदस्य गणेश बनकर यांना देण्यात आले आहे.शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, ग्रामपंंचायत याकडे गांभीर्याने घेत नाही. रस्त्याने जाणार्या वाहनचालकांवर भटके श्वानांकडून हल्ला केला जातो. घोडकेनगर, शिवाजीनगर, मोरेनगर व अंबिकानगर परिसरात असे प्रकार नित्याचे झाले आहेत. श्वान अंगावर येत असल्याने अपघातांना सामोरे जावे लागले आहे. नाशिक शहरातून पकडलेले श्वान परिसरात सोडत असल्याचा आरोप निवेदनात बसवंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सतीश मोरे, अनू मोरे, प्रवीण मोरे, चेतन मोरे, प्रशांत घोडके, संदीप झुटे, किरण संधान, मयूर गावडे, भूषण मुलाने आदींनी केला आहे.
आठ दिवसांत आत मालकांनी आपल्या जनावरांची व्यवस्था करावी. तसे न केल्यास ग्रामपालिकेच्या वतीने मोकाट जनावरे पकडून शेतकऱ्यांना बक्षीस म्हणून वाटप करण्यात येईल. मोकाट जनावरांची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आगामी बैठकीत सदस्यांशी चर्चा करून उपाययोजना करण्यात येईल.- अलका बनकर, सरपंच, पिंपळगाव बसवंत