नाशिक : कोरोना महामारीमध्ये मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. समाजाला शरीर स्वास्थ्याबरोबरच मानसिक आरोग्य कायम राखण्याचे महत्त्वदेखील कळू लागले आहे. मात्र, कोरोनामुळे बहुतांश नागरिकांच्या कामधंद्यावर, हातावर पोट असणाऱ्यांच्या रोजगारावरच गंडांतर आल्याने नैराश्यात वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच आजच्या इतकीच उद्याच्या भवितव्याच्या चिंतेने नागरिकांच्या विवंचनांमध्ये भर पडली आहे.
भारतात दुर्दैवाने मानसिक स्वास्थ्याबद्दल नागरिकांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात जागरूकता झालेली नाही. आपल्या शरीरावर कुठे साधे खरचटले तर आपण लगेच त्यावर उपचार करून ते बरे करण्याचा प्रयत्न करतो; परंतु आपल्या मनावर काही आघात होत असतील, तर मात्र आपण यावर कोणतेही उपचार करण्याचा प्रयत्न करीत नाही. गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली तसेच जीवघेण्या स्पर्धेमुळे ताणतणाव वाढले आहेत. अगदी बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत, चार भिंतीत वावरणाऱ्या गृहिणीपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांपर्यंत तणावाची पाळेमुळे खोल रुतल्याने दिवसागणिक मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. संपूर्ण भारताला लस मिळून देश कोरोनामुक्त होईल, तोपर्यंत प्रत्येकाला ही लढाई लढायची आहे. या लढाईत मानसिक आरोग्य हे फारच महत्त्वाचे आहे.
इन्फो
मानसिक ताणतणाव
गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगच एका मानसिक तणावाखाली वावरत आहे. प्रत्येक व्यक्ती या महामारीच्या संकटाखाली मानसिकदृष्ट्या दडपली जात आहे. कोणाची नोकरी गेली आहे, तर कोणाच्या नोकरीवर टांगती तलवार आहे, तर अनेकांचे उद्योग बंद झाले आहेत, कोणाच्या नात्यामध्ये दुरावा आला आहे, पैशाने सधन असणारी माणसेसुद्धा आपल्या प्रियजनांच्या जाण्यामुळे मानसिक ताणतणावाखाली वावरत आहेत.
मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला आवश्यक
वैद्यकीय निकषानुसार एकूण लोकसंख्येच्या एक टक्के लोक हे मनोरुग्ण असतात; परंतु कोरोना महामारीमुळे हे प्रमाण वाढत आहे. आत्मविश्वास कमी असणाऱ्या, लहानपणापासून हिंसा, उपेक्षा, शोषण, गरिबी झेलणाऱ्या व्यक्ती नैराश्याने त्रासलेल्या असतातच; परंतु कोरोना संकटात उदासीनता, सततची निष्क्रियता, कामातील रुची कमी होणे, स्वभाव चिडचिड किंवा संशयी होणे, शांत झोपेचा अभाव, भूक कमी होणे, सतत नकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली राहणे, मूड बदलत राहणे ही मानसिक आरोग्य बिघडल्याची लक्षणे आहेत. या लक्षणांकडे जर दुर्लक्ष केले तर आत्महत्या करणे, दुसऱ्याला दुखापत करणे तसेच कायमस्वरूपी निराश्येच्या गर्तेत जाण्याची भीती असते, अशा वेळी मनोविकारतज्ज्ञाचा सल्ला घेणे फारच महत्त्वाचे आहे.
इन्फो
नैराश्य दूर करणे शक्य
कोरोनामुळे आलेली बेरोजगारी, पुढील शिक्षण तसेच काही घरगुती अडचणींमुळे या वर्गाला मानसिक आजाराने ग्रासले आहे. आज कोरोना महामारीमुळे व सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अनेक नागरिक स्वतःहून उपचार करण्यास समोर येत आहेत, कोरोना महामारीमुळे सर्वांचेच अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व नकारात्मकतेमुळे आत्महत्यांचे प्रमाणही भविष्यात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तब्बल ८० टक्के आत्महत्या या मानसिक विकारातूनच होतात. मात्र, मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास त्यातील निम्म्यापेक्षा जास्त आत्महत्या थांबवणे शक्य असते.
कोट
मनोविकाराने त्रस्त नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, अशा प्रसंगांमुळे होणाऱ्या प्रत्येक मनोविकारावर मात करणे शक्य आहे; परंतु त्यासाठी संबंधित व्यक्तीने किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यकतेनुसार कौन्सिलिंग करून घेणे आवश्यक आहे.
-डॉ. हेमंत सोननीस, अध्यक्ष, आयएमए
--------------------
ही डमी आहे.