टाकळी खोडदेनगर मार्गावर खोदकाम
नाशिक : टाकळी रोडवरून खोडदेनगरकडे जाणाऱ्या मार्गावर खोदकाम करण्यात आल्याने वाहनधारकांची गैरसाेय होत आहे. वळण घेण्याच्या मार्गावरच जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जात असल्यामुळे या मार्गाने येणाऱ्या वाहनधारकांचा खोळंबा होत आहे.
टाकळी मार्गावर दुभाजकांचे सुशोभिकरण
नाशिक : टाकळी येथील मार्गावर असलेल्या दुभाजकांचे कामकाज सुरू झाले आहे. दुभाजकांची उंची वाढविण्यात येऊन त्यावर लोखंडी रेलींग उभारली जात आहे. या कामामुळे या मार्गाचे सौंदर्य वाढण्यास मदत होणार आहे. मध्यंतरी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. त्यामुळे आता दुभाजकाचे काम हाती घेण्यात आले आहे.
टाकळी चौक बनला धोकादायक
नाशिक : टाकळी येथील चौकातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्याची परिसरातील रहिवाशांची मागणी आहे. या मार्गाने अवजड वाहतूक वळविण्यात आली असल्याने भर वस्तीमधून होणारी वाहतूक धोकादायक ठरत आहे. रस्ता अरुंद असल्याने चौकातून अवजड वाहने वळण घेताना दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कामटवाडेसाठी बसेस नसल्याने गैरसोय
नाशिक : नाशिकरोड येथून कामटवाडे येथे जाण्यासाठी बसेस नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. नाशिकरोड येथून अंबड तसेच सिडकोत येणाऱ्यांची संख्या अधिक असते. मात्र, त्यांना वेळेवर आणि पुरेशा बसेस नसल्याने गैरसोय होते. या मार्गावरील बसेस वाढविण्याची मागणी होत आहे.