लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : चतुर्मास सुरू झाल्याने आणि चार दिवसांपासून श्रावण सुरू होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर व्रतवैकल्यांची माहिती देणाऱ्या, ईश्वर आराधनेस मदत करणाऱ्या विविध धार्मिक पुस्तकांना मागणी वाढली आहे.धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात वेळेची कमतरता भरून काढण्यासाठी आणि प्रवासात वाचन, पारायण करून ईश्वर आराधनेची कसर भरून काढणाऱ्यांकडून पॉकेटसाइज धार्मिक पुस्तकांना पसंती दिली जात आहे. धार्मिक व शैक्षणिक पुस्तकांवर कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागलेला नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सध्यातरी पुस्तकांच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.सध्या पुस्तकांच्या दुकानांमधून नवनाथ पारायण, हरिकथा, ज्ञानेश्वरी, श्रीमद् भागवत कथा, गुरुचरित्र, रामायण, महाभारत, सुंदरकांड, श्रीदत्त परिक्रमा, संपूर्ण चतुर्मास, कहाणीसंग्रह, शनि उपासना, शिव उपासना, विजयग्रंथ आदी पुस्तकांची ग्राहकांकडून खरेदी केली जात आहे. पॉकेटसाइज पुस्तकांमध्ये मनाचे श्लोक, रामरक्षा, हनुमान चालिसा, अथर्वशीर्ष, गायत्री मंत्र, शिवलीलामृत आदी पुस्तकांना मागणी वाढली आहे. भाविक या दिवसांमध्ये वेळ मिळेल तेव्हा सकाळी, दुपारी, सायंकाळी, प्रवासात धार्मिक पुस्तकांचे वाचन, मनन, चिंतन, पारायण करताना दिसत आहेत.
धार्मिक पुस्तकांना वाढली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:03 AM