- अझहर शेख नाशिक - काठे गल्ली सिग्नलकडून भाभानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या एका धार्मिकस्थळाचे वाढीव अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शनिवारी (दि.२२) हटविले. सकाळी सात वाजेपासून याठिकाणी पोलीस, मनपाचा लवाजमा दाखल झाला होता. यामुळे या भागात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. पोलिस आयुक्तालयाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या भागात मोठा सशस्त्र फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
महापालिकेकडून प्रार्थनास्थळाचे अतिक्रमण काढले जात नाही, म्हणून याठिकाणी प्रशासनाच्या निषेधार्थ शनिवारी आंदोलन करण्याचा इशारा समाजमाध्यमांवरून काही संघटनांकडून देण्यात आला होता. यानंतर पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कलम-१४४ लागू केला. या भागात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमण्यास मज्जाव करण्यात आला होता. काठेगल्ली-पखालरोड रस्त्याकडे येणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरेकेडिंग करून बंद ठेवले होते. पौर्णिमा बसस्थानक ते तुलसी आय रूग्णालयमार्गे पखालरोडकडे येणारा रस्ता, वडाळारोडकडून सावित्रीबाई फुले शाळेकडे नंदिनी नदीच्या काठापासून जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच या भागात सर्वत्र पोलिसांचा चोख बंदाेबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे या परिसरात रात्री उशीरापर्यंत तणावपूर्ण शांतता पसरलेली होती.