नाशिक : नोटा छपाईचा कारखाना असलेल्या नाशिकमधील करन्सी नोटप्रेसमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून नोटा छपाईच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करावा लागत असून, काही सुटीच्या दिवशीदेखील नोटा छपाईच्या मशिन्स धडधडत आहेत. या ठिकाणी दहा ते पाचशे रुपयांच्या नोटांची छपाई केली जाते.
कोरोनाच्या प्रभावामुळे कामकाजाच्या वेळेत आणि उपस्थितीत झालेल्या बदलांमुळे अनेक क्षेत्रातील कामकाज मंदावले आहे. त्याप्रमाणे नाशिकमधील करन्सी नोटप्रेसमधील कामकाजावरही त्याचा परिणाम झाला होता. कर्मचारी उपस्थिती संख्या आणि गर्दीवर निर्बंध आल्यामुळे नोटप्रेसमधील कामकाजही कमी झाले होते. शेड्युल्डनुसार कामकाज नियमित सुरू असले तरी त्यानुसार उत्पादन कमी करण्यात आले होते. परंतु आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागताच नोटांच्या छपाईला वेग आला आहे.
नोटप्रेसमध्ये दिवस आणि रात्रपाळीत कामकाज चालते. या ठिकाणी अनेक विभाग कार्यरत असून, नोटा छपाईशी संबंधित कर्मचारी आणि विभागांचे कामकाज सध्या वाढले आहे. दिवसपाळीत सकाळी ७ ते सायंकाळी ४.३० अशी डयुटी असते, तर रात्रपाळीतही सायंकाळी ७ ते पहाटे ४.३० पर्यंत कामकाज चालते. आता या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त दोन तासांचा ओव्हरटाईम करावा लागत आहे. रविवारी सुटीच्या दिवशीदेखील नोटा छपाईशी संबंधित कर्मचाऱ्यांना कामावार जावे लागत आहे. यावरून नोटा छापाईच्या कामाला चांगलाच वेग आल्याचे दिसून येते.
--इन्फो--
दुपारच्या सुटीतही कामकाज
प्रलंबित कामे अधिक असल्याने दुपारच्या जेवणाच्या सुटीतही कामकाज असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आता खास जेवणासाठी बाहेर न जाता कारखान्यातच एकमेकांच्या जेवणाची वेळ सांभाळून सलग काम करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
--इन्फो--
कर्मचारी संख्या कमी
पूर्वीपेक्षा आता नोटप्रेसमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर अधिकाधिक नोटांची छपाई करावी लागत असल्याने कर्मचाऱ्यांना अतिरिक्त दोन तास काम करावे लागत आहे. कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे नोकर भरतीबाबतची अनेकदा चर्चा झाली आहे. येथील नेत्यांनीदेखील कर्मचारी भरतीची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रेसमध्ये लवकरच भरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही कळते.