नाशिक : कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या वर्षीही ऑनलाइन एज्युकेशनवरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाचा साधारण ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च वाढला असून ज्या घरांमध्ये एकापेक्षा अधिक मुले ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. अशा कुटुंबातील पालकांना ऑनलाइन शिक्षणात खर्च परवडेनासा झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरातील शाळा ऑनलाइन वर्ग घेत आहेत. त्यासाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एका मोबाइल कनेक्शनला एक ते दीड जीबी इंटरनेट मिळते. मात्र, ऑनलाइन वर्गामुळे दुपारपर्यंतच ते संपून जाते. त्यामुळे पालकांना रोजच्या कामासाठी पुन्हा नेट पॅक खरेदी करावा लागत असल्याने अनेकांना हा खर्च पेलवेनासा झाला आहे. कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. विविध कार्यालये आणि कामधंदे बंद असल्यामुळे अनेक पालकांना त्यांच्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत. तर बहुतांश कार्यालयांमधील कर्मचारी घरून काम करीत आहेत. विद्यार्थ्यांचेही ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. साधारणत: एका मोबाइल कनेक्शनला दिवसात किमान दीड जीबी डेटा मिळतो. मात्र, ऑनलाइन वर्गामुळे तीन ते चार तासांत तो संपून जातो. पालकांना पुन्हा नेट पॅक खरेदी करावा लागतो. त्यामुळे ऑनलाइन वर्ग महागात पडत असल्याच्या तक्रारी पालकांकडून होत आहेत.
---
दोन मोबाइल अन् इंटरनेटचा खर्च वाढला
रोज एक जीबी डेटा मोबाइल कंपनीकडून मिळतो. पूर्वी आम्ही हा डेटा पूर्ण दिवस वापरायचो. आता मुलांचे ऑनलाइन वर्ग सकाळीच सुरू होतात. दुपारी १२ वाजेपर्यंत तेवढा डेटा संपूनही जातो. त्यामुळे इतर कामासाठी आम्हाला पुन्हा नव्याने ‘डेटा पॅक’ घ्यावा लागतो.
- राजीव पवार, पालक
दोन मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी दोन स्वतंत्र मोबाइल घ्यावे लागले असून दोन्ही मोबाइलला इंटरनेटसाठी येणाऱ्या खर्चामुळे शिक्षण परवडेनासे झाले आहे. त्यातच शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही शाळांकडून संपूर्ण फी आकारली जात आहे. शिवाय मुले घरीच असल्याने दुसरे काही कामही करता येत नाही. त्यामुळे आर्थिक गणितच बिघडले आहे.
- अंजली जाधव, पालक
---
जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली - १,१७,०४५
दुसरी - १,२१,३४२
तिसरी - १,२०,६१८
चौथी - १,२३,९३९
पाचवी - १,२२,७४३
सहावी - १,२०,६४५
सातवी - १,१८,३३२
आठवी - १,१५,९१०
नववी - १,११,४२१
दहावी - ९८,९५९
मोबाइल किंवा संगणक आणि इंटरनेट
मोबाइल कंपन्यांनी सुरुवातीला दिलेल्या मोफत इंटरनेटसेवांसाठी आता साधारणत: चारशे ते पाचशे रुपयांचे रिचार्ज करावे लागत आहे. यात एका मोबाइल कनेक्शनला दिवसात किमान दीड जीबी डेटा मिळतो. मात्र, ऑनलाइन वर्गामुळे तीन ते चार तासांत तो संपून जातो. त्यामुळे घरात दोन मुले असतील तर दोन मोबाइलसाठी दोने वेगळे नेट पॅक खरेदी करावे लागतात. त्यासोबतच मोबाइल, संगणकासाठी येणारा खर्चही पालकांना करावा लागत असल्याने ऑनलाइन वर्ग महागात पडत असल्याची प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे.
--मुलांचे होतेय नुकसान
ऑनलाइन शिक्षणामुळे लहान मुलांच्या हातात मोबाइल आल्यामुळे त्यांचा स्क्रीन टाइम वाढून बौद्धिक विकासाला खीळ बसून चिडचिड वाढते. ऑनलाइन तासिका शिक्षणानंतरही मुलांच्या हातात मोबाइल राहत असल्याने कार्टून बघण्याचे प्रमाण वाढून त्यांच्या वागण्यातही ते उमटू लागते. त्याचप्रमाणे मोठी मुले शिक्षणानंतर मोबाइलचा वापर अन्य गोष्टींसाठी करीत असल्याने त्यांच्या वेगवेगळ्या गेम्स, तसेच पॉर्न ॲडिक्ट होण्याचे प्रमाण वाढते. नंतर ते प्रयत्न करूनही यातून बाहेर पडू शकत नसल्याने मुलांचे नुकसान होत आहे.
-डॉ. शामा कुलकर्णी, बालमानसविकासतज्ज्ञ