नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव ओसरत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण भागात पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने चिंता वाढल्या आहेत. विशेषत: निफाड तालुक्यातील रुग्णसंख्या गुरुवारी (दि. १६) साठवर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यात अद्याप ओमायक्रॉनचा शिरकाव झाला नसला तरी आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा खबरदारी म्हणून सतर्क झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र, सिन्नर, निफाड व येवला तालुक्यातील रुग्णसंख्या काही घटत नसल्याने चिंतेत भर पडत गेली. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेने उपाययोजना राबवल्या. नाकाबंदी करतानाच विलगीकरणातील रुग्णांना सक्तीने रुग्णालयात दाखल करणे सुरू केले. याशिवाय लसीकरणावरही भर दिला गेला. त्यामुळे गेल्या आठवड्यात निफाडसह सिन्नर, येवला या तालुक्यातील रुग्णसंख्येत घट दिसून येऊ लागली होती. परंतु गेल्या दोन दिवसात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यातही निफाड तालुक्यात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणखी सतर्क झाला आहे.
ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचा वाढला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 01:26 IST