गावांमध्येही दक्षतेचे आदेश
नाशिक : जिल्हा प्रशासनाने कारवाईचे अधिकार तहसीलदारांना दिल्याने आता ग्रामीण भागात अधिक लक्ष केंद्रित केले जात असल्याचे दिसून येते. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अनेक गावांनी याबाबतचे फलकदेखील लावले आहेत. सुरक्षित अंतराचे पालनदेखील केले जात आहे.
व्यावसायिकांची कोरोना चाचणी करावी
नाशिक : व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने विक्रेत्यांपासूनदेखील धोका निर्माण होऊ शकतो.
पीक पंचनामे पूर्ण करण्यात यावेत
नाशिक : जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर आता अवकाळीचे संकट दूर झाले असून शासनाने पीक पंचनामे पूर्ण करावेत अशी मागणी केली जात आहे.