नाशिक जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांप्रमाणेच कोरोनाबाधितांच्या संख्येत कोमॉर्बिड आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत कोरोनामुक्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळेच फायब्रोसिस होण्याच्या प्रमाणातही गत महिनाभरापासून वाढ झाल्याचे आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा रुग्णालय तसेच बिटको रुग्णालयात पोस्ट कोविड सेंटरदेखील सुरू करण्यात आले आहे. त्यात दररोज किमान ८ ते १० पोस्ट कोविड रुग्ण येत असून, त्यांना श्वास घेण्यास त्रास होणे, वारंवार दम लागणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा अशा समस्या दिसून येत आहेत. फुप्फुसांच्या या समस्येलाच फायब्रोसिस म्हणून ओळखले जाते. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतर धोका पूर्णपणे टळल्याच्या भ्रमात कुणीही राहू नये, असेच तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इन्फो
ज्येष्ठांनी घ्यावी अधिक काळजी
जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तसेच ज्यांचे वय साठीपेक्षा अधिक आहे, अशा रुग्णांनी कोरोनामुक्तीनंतरही चार महिने काळजी घ्यायला हवी. त्यांना डॉक्टारांनी सांगितलेले व्यायामदेखील करणे अत्यावश्यक आहे, तसेच मधुमेह, बीपी, किडनी, लिव्हर यांसारख्या जुन्या अन्य व्याधींनी ग्रस्त असलेले कोमॉर्बिड रुग्ण यांनी त्यांच्या नियमित गोळ्यांबरोबरच डाक्टरांनी दिलेल्या निर्देशानुसार औषधोपचार सुरू ठेवणे अत्यावश्यक आहे.
इन्फो
थकव्याचा आणि श्वसनाचा त्रास
जे रुग्ण पोस्ट कोविड सेंटरमध्ये येत आहेत, त्यांना प्रामुख्याने थकव्याचा आणि श्वसनाचा त्रास जाणवण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्याने श्वसनाचे त्रास होण्याचे प्रमाण अधिक वेगात वाढू लागले आहे. ज्यांच्या फुप्फुसांची कार्यक्षमता कमी झाली अ्राहे, त्यांना अधिक दीर्घ श्वसन करावे लागण्याचे प्रकारदेखील आढळत आहेत.