कोव्हॅक्सिन प्रोटोकॉल प्रमाणेच
नाशिक: कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत, त्यांनाच दुसरा डोस दिला जाणार असून ज्यांचा १२ ते १६ आठवड्यांचा कालावधी पूर्ण झाला नसेल त्यांना दुसरा डोस दिला जाणार नाही. त्यामुळे कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसऱ्या लसीसाठी घाई करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. शनिवारपासून याबाबतची अंमलबजावणी केली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस देण्याचा कालावधी हा ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे असा केलेला आहे, त्यामुळे जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत नवीन संशोधनास अनुसरुन केंद्र सरकार व राज्य शासनाच्या नव्याने प्राप्त सूचनांनुसार यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेला आहे, अशा लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसचे अंतर ६-८ आठवड्यांवरून १२-१६ आठवडे इतके ठरवण्यात आलेले आहे. म्हणजेच ८४ दिवसांनंतर दुसरा डोस देय राहील, असे मांढरे यांनी कळविले आहे.
कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसच्या यापूर्वीच्या प्रोटोकॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस पूर्वीप्रमाणेच ४-६ आठवड्याने देण्यात येणार आहे. दरम्यान, १८-४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे राज्य शासनाच्या प्राप्त सूचनांनुसार सध्या लसीकरण थांबवण्यात आलेले असून पुढील सूचना प्राप्त झाल्यावरच त्यांचे लसीकरण सुरु करण्यात येईल त्यामुळे नागरीकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. या संदर्भात कोविन पोर्टलवरसुद्धा आज रात्रीपासून (१५ मे) ही माहिती अपडेट करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी न करता लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे, असे उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे.