चांदोरी : उन्हाची झळा... घामाच्या धारा...अन् त्यातून येणारे आजारपण... गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून उन्हाच्या तडाख्याने घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता असते. अशा वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद सवाई यांनी दिला आहे.
उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी कोणी छत्र्यांचा, तर कोणी गॉगल, टोपीचा वापर दिवसभरात वारंवार करताना दिसत असतात. उन्हाच्या काहिलीमुळे उष्माघाताचा फटका बसण्याची दाट शक्यता असते. उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी संबंध आल्याने उष्माघात होतो. थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुद्धावस्था आदी उष्माघाताची लक्षणे असल्याची माहिती डॉ. मुकुंद सवाई यांनी दिली.
उन्हाळ्यात शेतावर, मजुरीची कामे फार वेळ केल्यास तसेच कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम केल्यास उष्माघात होऊ शकतो. जास्त तापमानाच्या खोलीत काम केल्यास आणि घट्ट कपड़े वापरल्यासही उष्माघात होऊ शकतो. उष्माघात झालेल्या रुग्णाला हवेशीर खोलीमध्ये ठेवावे. हवेशीर खोलीत पंखे अथवा कुलर ठेवावे, तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, बर्फाच्या पाण्याने आंघोळ घालावी, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात तसेच आईसपॅड लावावेत, सलाईन लावावी, अशा प्रकारचे उपचार उष्माघाताच्या रुग्णांवर आवश्यक असल्याचेही डॉक्टंराकडून सांगण्यात आले.उष्माघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे) वापरू नयेत. सैल किंवा पांढऱ्या रंगाचे कपड़े वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा. पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे, अधूनमधून सावलीत विश्रांती घ्यावी, वरील लक्षणे सुरू होताच उन्हातील काम थांबवून उपचार सुरू करावा, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.उष्माघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमान असताना करावीत. उन्हात बाहेर जाताना गांगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा, असे केल्यास उष्माघात टळू शकतो.-डॉ. अविनाश खालकर